संभाजी मैदानासाठी मुलुंडवासीयांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:37 AM2018-05-03T04:37:09+5:302018-05-03T04:37:09+5:30

मुलुंड पूर्वेकडील साडेचार एकर जागेवर असलेल्या राजे संभाजी मैदानाचे काँक्रीटीकरण करून मिनी स्पोर्ट्स क्लब तयार करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मुलुंडकरांनी आवाज उठवला आ

Mulundhaban's Elgarar for Sambhaji Maidan | संभाजी मैदानासाठी मुलुंडवासीयांचा एल्गार

संभाजी मैदानासाठी मुलुंडवासीयांचा एल्गार

Next

मुंबई : मुलुंड पूर्वेकडील साडेचार एकर जागेवर असलेल्या राजे संभाजी मैदानाचे काँक्रीटीकरण करून मिनी स्पोर्ट्स क्लब तयार करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मुलुंडकरांनी आवाज उठवला आहे. मातीचे मैदान वाचविण्याऐवजी काँक्रीटीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.
या खेळाच्या मैदानाचे रूपांतर मनोरंजनात्मक मैदानात करण्याचा डाव असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना हक्काच्या मैदानाला मुकावे लागणार असल्याचा आरोप मुलुंडकरांनी केला आहे. मात्र, तीव्र विरोधानंतरही काँक्रीटीकरण करण्याचे काम रेटण्याचा प्रयत्न झाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. संभाजी राजे मैदानापासून हाकेच्या अंतरावर चिंतामणीराव देशमुख उद्यान आहे. तिथे असलेली स्केटिंग रिंग वापराअभावी धूळ खात पडलेली आहे. मात्र, स्थानिक नगरसेविका रजनी केणी यांच्या अट्टाहासामुळे संभाजी मैदानात अशा प्रकारची स्केटिंग रिंग बसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केला. शिंदे यांच्यासह प्रकाश पवार व विजय सावंत यांच्या वतीने अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे.
या ठिकाणी बास्केट बॉल मैदान तयार करून, इतर सुविधा पुरवण्यासाठी काम सुरू होते. त्यासाठी या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात येत होते. सात कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने मैदानाचे सुमारे ६ हजार मीटर क्षेत्र विकसित करण्यासंदर्भात आराखडा प्रसिद्ध केला होता. मातीचे मैदान वाचवणे ही काळाची गरज आहे. या मैदानात सुटीच्या दिवशी एकावेळी तब्बल १ हजार मुले खेळतात. स्पोर्ट्स क्लब उभारल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना व विद्यार्थ्यांना पैसे देऊन प्रवेश घ्यावा लागण्याची भीती शिंदे यांनी व्यक्त केली. नगरसेविकेच्या बालिश हट्टासमोर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, विकासाची दृष्टी नसलेला हा निर्णय आहे. खेळाच्या मैदानाचे मनोरंजनाच्या मैदानामध्ये रूपांतर केले जात आहे. या माध्यमातून विकास नियंत्रण नियमावलीचा भंग केला जात आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाविरोधात तीव्र संतापाचे वातावरण
आहे.
मुळात या ठिकाणी संभाजी राजे मैदान उभारण्यासाठी सुमारे २८ वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या वसाहतीची जागा मिळविण्यात आली होती. या मैदानाची देखरेख करणाऱ्या संस्थेने येथे १५ वर्षांपूर्वी म्युझिकल जॉगिंग ट्रॅक उभारला होता. त्याचा वापर परिसरातील सुमारे चार हजार नागरिक दररोज करतात. या परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी व विविध क्रीडा स्पर्धांसाठी हे हक्काचे मैदान आहे. महापालिकेने नवीन आराखड्यानुसार या ठिकाणी स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल, फुटबॉल व बास्केट बॉल कोर्ट बनविण्याचे जाहीर केले.
यामुळे या मैदानाचा भाग कमी होऊन विनाकारण या ठिकाणी काँक्रीटीकरण वाढणार आहे. विशेष म्हणजे याला नागरिकांनी मोठा विरोध करत स्वाक्षरी अभियान राबवल्यानंतरही महापालिकेने नागरिकांच्या रोषाची दखल घेतली नसल्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात
आली.

Web Title: Mulundhaban's Elgarar for Sambhaji Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.