मराठी महिलेला जागा न देणाऱ्या मुलुंडच्या पिता- पुत्राला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:21 AM2023-09-30T10:21:19+5:302023-09-30T10:21:33+5:30
मुलुंड परिसरात राहणाऱ्या तृप्ती देवरुखकर (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी महिलेला कार्यालयासाठी घर नाकारणाऱ्या पिता-पुत्राला मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पाच हजारांचा बॉण्ड लिहून घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. झालेल्या प्रकाराबद्दल उभयतांनी माफीही मागितली आहे.
मुलुंड परिसरात राहणाऱ्या तृप्ती देवरुखकर (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला. डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाचे काम करणाऱ्या तृप्ती या त्यांच्या कामासाठी कार्यालयाची जागा शोधत होत्या. त्यावेळी त्यांना धक्कादायक अनुभव आला. मुलुंड पश्चिमेकडील शिवसदन सोसायटीतील प्रवीणचंद्र तन्ना (८०) आणि त्यांचा मुलगा नीलेश तन्ना (५३) यांनी त्यांना ‘हमारे यहाँ महाराष्ट्रीयन लोगों को जगह नही देते’, असे सांगत बाहेरचा रस्ता दाखवला. तृप्ती यांनी या नियमाबाबत लेखी पुरावा मागताच, पिता-पुत्राने त्यांना शिवीगाळ केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देवरुखकर यांनी व्हायरल केला. याप्रकरणी टीकेची झोड उठताच मुलुंड पोलिसांनी तृप्ती यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला.