मुंबई : भिशीच्या पैशांसह बेपत्ता असलेल्या मुलुंडच्या नितीन दशरथ त्रिभुवन (२९) या तरुणाचा अखेर २० दिवसांनंतर शोध लागला आहे. त्याला शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्याच्याकडील पैसे चोरीला गेले आहेत. मात्र या मिसिंग मिस्ट्रीमागे कुणाचा हात आहे, याचा शोध मुलुंड पोलीस घेत आहेत.मुलुंड पश्चिमेकडील जनता विकासनगर चाळीत नितीन पत्नी आणि मुलासोबत राहतो. १९ तारखेच्या रात्री त्याने भिशीचे अकरा हजार रुपये उचलले. त्यानंतर २० तारखेला सकाळी तो पत्नीसोबत कामाला निघाला. मात्र घरी परतला नाही. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल होताच त्यांनी शोध सुरू केला. मुंबई, ठाणेसह नवी मुंबई, नाशिक कसारा परिसर पोलिसांसह त्याच्या कुटुंबीयांनी पिंजून काढला. यात तो नाशिकच्या दिशेने गेला असल्याची माहिती मिळाली होती. त्या दिशेने कुटुंबीयांनी शोधाशोध वाढविली होती. अखेर २० दिवसांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तो शिर्डीत असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत त्याला ताब्यात घेतले. गेल्या २० दिवसांपासून तो एकाच कपड्यांवर होता. त्याच्याकडील पैसेही चोरीला गेले आहेत. शिवाय त्याला मारहाणही झाली असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
मुलुंडचा बेपत्ता तरुण शिर्डीत सापडला
By admin | Published: January 10, 2017 7:09 AM