भाजपाचे निष्ठावंत नेते आणि विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून भाजपानं यावेळी मनोज कोटक यांना मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. किरीट सोमय्यांबद्दल शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी, सोमय्यांना तिकीट दिल्यास प्रचारात मदत न करण्याचा त्यांनी दिलेला इशारा, पक्षातही सोमय्यांबद्दल असलेली दोन वेगवेगळी मतं, या पार्श्वभूमीवर भाजपानं अगदी शेवटी कोटकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्याचा त्यांना मोठा फायदा झाल्याचं निकालातून पाहायला मिळतंय.
ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली होती. गेल्या निवडणुकीत ३ लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालेले संजय पाटील यावेळी कोटक यांना टफ फाइट देतील, असं मानलं जात होतं. परंतु, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासूनच मनोज कोटक यांनी आघाडी घेतली आणि ती वाढतच गेली.
आत्ताच्या आकडेवारीनुसार, मनोज कोटक यांनी ५ लाख ०९ हजार १७० मतांसह दणदणीत आघाडी घेतली आहे. संजय दिना पाटील यांनी २ लाख ८५ हजार १०८ मतांपर्यंत मजल मारली आहे.
२०१४च्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी ५ लाख २५ हजार २८५ मतांनी विजय साकारला होता, तर संजय दिना पाटील यांना २ लाख ०८ हजार १६३ मतं मिळाली होती.