मुंबापुरी झाली मराठामय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 07:03 AM2017-08-09T07:03:30+5:302017-08-09T07:03:34+5:30

मराठा क्रांंती मूक मोर्चासाठी रणशिंग फुंकत राज्यभरातील मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी आणि त्यांची शेकडो वाहने मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय होऊन गेले. सांगली, सातारा, सोलापूर येथील मराठा आंदोलकांनी मंगळवारी दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंटसमोर काळा झेंडा फडकवत सरकारचा निषेध केला.

 Mumbaapuri becomes Maratha ... | मुंबापुरी झाली मराठामय...

मुंबापुरी झाली मराठामय...

googlenewsNext

 मुंबई : मराठा क्रांंती मूक मोर्चासाठी रणशिंग फुंकत राज्यभरातील मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी आणि त्यांची शेकडो वाहने मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय होऊन गेले. सांगली, सातारा, सोलापूर येथील मराठा आंदोलकांनी मंगळवारी दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंटसमोर काळा झेंडा फडकवत सरकारचा निषेध केला.
बुधवारी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे चिकटवलेली शेकडो वाहने मंगळवारी दुपारपासूनच मुंबईत दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यातील काही आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत, सीएसटी परिसर दणाणून सोडला. सीएसएमटीच्या सेल्फी पॉइंटवर जाऊन निषेधाचा झेंडा फडकवणाºया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत सोडून दिले. या आंदोलकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, सुमारे अडीचशे आंदोलक मंगळवारी दुपारीच ट्रेनने आल्याचे एका आंदोलकाने सांगितले.

सकल मराठा समाजाशिवाय इतर नेते, समाजसेवक, संघटना, इतर समाज आणि प्रशासनाकडून शहर व शहराबाहेर अनेक ठिकाणी नाश्ता, पाणी, सरबत, विश्रांतिगृह, स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुलुंड चेकनाका, वाशी मार्केट, चेंबूरचा शिवाजी महाराज पुतळा, आणिक आगार, सुमन चौक, आझाद मैदान, कात्रज चौक वाथवडे, भारतमाता-लोअर परळ, वसंतदादा महाविद्यालय, आॅर्थर रोड नाका, भांडुपचा पवई ब्रीज, जिजामाता उद्यान, भारती विद्यापीठ खारघर यासारख्या अनेक ठिकाणी पाणी, सरबत आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरही फिव्हर...
सोशल मीडियाचे प्रत्येक संकेतस्थळ आणि अ‍ॅपवर मराठा क्रांती मोर्चाचे अपडेट्स पडत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने प्रत्येक मराठा बांधवाला मोर्चात सामील होण्यासाठी भावनिक आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था, चहापाण्याची व्यवस्था यांची माहिती देणारे मेसेजेसही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. आंदोलकांसह बहुतेक ग्रुपचे डीपी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा क्रांती मोर्चा’ या आशयाचे होते.

भायखळा रेल्वे वसाहतींचा आसरा

भायखळा येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टीट्यूटमध्ये ३०० मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था रेल मराठा संयोजनाने केली आहे. शिवाय रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये आंदोलकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था केली आहे. बाहेरील जिल्ह्यांतून पहाटे येणाºया महिला आंदोलकांसाठीही रेल्वे वसाहतीमधील काही खोल्या रिकाम्या केल्याचे संयोजक नरेंद्र तळेकर यांनी सांगितले.

मराठा मुंबईत धडकले...
मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात होणाºया वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या मैदानावर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी वरिष्ठांकडून सूचना देण्याचे काम सुरू होते. राणीबाग मैदानाचा ताबा टोपी आणि टी-शर्ट विक्रेत्यांनी घेतला आहे.

औरंगाबादहून आलेला नरेंद्र सांगळे सांगत होता, सुमारे अडीच हजार आंदोलकांना टोप्या वाटण्यासाठी आलो आहे. औरंगाबाद विद्यापीठात एमफिल करत असून, मोर्चात सामील होण्यासाठी इथे आलो आहे. आरक्षण मिळेल की नाही ते माहिती नाही. मात्र, शेवटपर्यंत प्रयत्न सोडणार नसल्याचे त्याने सांगितले.

सांगलीहून आलेला उद्धव इंगळे आंदोलकांच्या हातावर टॅटू काढण्याचे काम करत होता. सकाळीच मुंबईत दाखल झालेला उद्धव अवघ्या दोन मिनिटांत स्प्रे पेंटिंगच्या मदतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘मराठा’ अशा विविध नावांचे टॅटू काढून देत होता.

मोफत पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अन् फिरती शौचालयेही!
मराठा मोर्चादरम्यान आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये फिरते शौचालय, पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. १२० डॉक्टरांचे पथक व मोर्चाच्या मार्गावर रुग्णवाहिकाही सज्ज असणार आहे. मोर्चाला सेवा-सुविधा हव्या असल्यास शुल्क भरा, असे महापालिकेने बजावले होते.
मात्र, महापालिकेच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे अखेर या मोर्चाची दखल घेणे पालिकेला भाग पडले आहे. मोर्चाच्या मार्गात सात ठिकाणी १५ फिरती शौचालये, आठ मोठे पिण्याच्या पाण्याचे टँकर ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. तसेच सहा ठिकाणी वैद्यकीय पथके ठेवण्यात येणार आहेत. या पथकात प्रत्येक ठिकाणी १० महिला व १० पुरुष डॉक्टर असणार आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी टोइंग गाड्यांचीही सोय करण्यात आली आहे.

अशी आहे फिरती शौचालयांची व्यवस्था
च्माटुंगा, प्रतीक्षानगर नाला : २, माटुंगा, जे. के. केमिकल
नाला : ३
च्बीपीटी, सिमेंट यार्ड : ४, भायखळा, ई. एस. पाटनावाला मार्ग : २, ह्युम हायस्कूल, एटीएस कार्यालय : १, हज हाउस : १, आझाद मैदान : २

पिण्याच्या पाण्याचे टँकर
वसंतदादा पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, सायन : २, बीपीटी, सिमेंट यार्ड : ४
राणीबाग : १, आझाद मैदान : १
वैद्यकीय पथके (प्रत्येक ठिकाणी दहा महिला व दहा पुरुष डॉक्टर)
प्रयदर्शनी, राणीबाग, जे. जे. उड्डाणपुलाजवळ, सीएसटी रेल्वे स्टेशन, आझाद मैदान, बीपीटी सिमेंट यार्ड : पाच पुरुष व पाच महिला डॉक्टर

ठाण्यातही भगवे वादळ

राज्यातून येणारे मोर्चेकरी आणि शहापूर, मुरबाडसारख्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी पार्किंग, चहा-नाश्ता, पाणी, वैद्यकीय मदत अशी व्यवस्था संध्याकाळपासूनच सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच कोपरी आनंदनगर जकात नाका येथे सुमारे ५० हजार जणांसाठी चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० मोबाईल टॉयलेटही उभारण्यात आली आहेत.

मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोर्चेकºयांच्या स्वागताच्या कमानी, झेंडे, फ्लेक्स यामुळे शहरातील प्रमुख रस्ते भगवे झाले आहेत. मुंबई आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शक्यतो लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीही मोर्चासाठी सज्ज
मराठा मूक मोर्चासाठी कल्याण- डोंबिवलीही सज्ज झाली असून कल्याणहून प्रचंड प्रमाणात समाज बांधव सहभागी होतील, असे आयोजकांनी सांगितले. डोंबिवलीतूनही मोठया प्रमाणावर कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मराठवाड्यातील ५०० मोर्चेकरी डोंबिवलीत दाखल झाले आहेत. त्यांची राहण्याची सोय पूर्वेकडील के. बी. विरा हायस्कूल आणि पश्चिमेकडील स. है. जोंधळे हायस्कुलमध्ये करण्यात आली आहे. पुणे, विदर्भातूनही मराठा बांधव दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.



 

Web Title:  Mumbaapuri becomes Maratha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.