Join us

दिव्यांच्या रोषणाईने उजळली अवघी मुंबापुरी

By admin | Published: November 11, 2015 3:12 AM

सुगंधी तेलासह उटण्याच्या साक्षीने अभ्यंगस्नान उरकत मुंबईकरांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला. भल्या पहाटे प्रफुल्लित मनांनी एकमेकांवर दिवाळीच्या शुभेच्छांचे वर्षाव होत राहिले.

मुंबई : सुगंधी तेलासह उटण्याच्या साक्षीने अभ्यंगस्नान उरकत मुंबईकरांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला. भल्या पहाटे प्रफुल्लित मनांनी एकमेकांवर दिवाळीच्या शुभेच्छांचे वर्षाव होत राहिले. तुळशी वृंदावनावर दाखल झालेल्या सूर्यकिरणांनी गगन व्यापले आणि त्याचवेळी अस्ताला जाणाऱ्या चंद्राला साक्षी ठेवत मुंबईकरांनी केलेल्या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला. अशाच काहीशा आनंदाने भारावलेल्या दिवाळीच्या वातावरणात दिवसभर पारंपरिक वेशभूषेनेही भर घातली. सायंकाळी दारोदारी लागलेल्या नेत्रदीपक दिव्यांनी मुंबई अक्षरश: उजळून निघाली. लक्ष्मीपूजनासाठी आता आर्थिक राजधानी सज्ज झाली आहे.मुंबई शहर आणि उपनगरांत दिवाळीचा पहिलाच दिवस आनंदाचा होता. विशेषत: दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या चाळींसह टॉवरमध्ये साजऱ्या झालेल्या दिवाळीने मुंबापुरीत रंगत आणली.भल्या पहाटे चाळींमधल्या दारोदारी आणि गगनचुंबी टॉवरच्या खिडक्यांमध्ये आणि चाळींच्या जिन्यांवर लागलेल्या दिव्यांसह कंदिलांनी मुंबईचे आकाश उजळून निघाले. बाजारपेठांतील मिठाई आणि फटाक्यांची दुकाने गर्दीने फुलून गेली. कंदिलांच्या खरेदीसह रांगोळीच्या खरेदी-विक्रीने बाजारपेठांत रंगांची उधळण केली. फुललेल्या बाजारपेठा, दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई, कंदिलाचा उजळणारा प्रकाश, उटण्याचा सुगंध, तोंड गोड करणारी मिठाई अशा उत्साही वातावरणाने दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गोड झाली.