Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान!
By संतोष आंधळे | Published: November 17, 2024 09:45 AM2024-11-17T09:45:59+5:302024-11-17T09:48:24+5:30
या मतदारसंघातील भुलेश्वर, कुंभारवाडा, खेतवाडी परिसरात मराठी, गुजराती, जैन, मारवाडी समाजाची लोकसंख्या अधिक आहे.
Mumbadevi Vidhan Sabha 2024 : दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या या परिसरात अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या १०० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न भिजत पडला आहे. अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या या मतदारसंघातून तीनदा विजयी झालेले काँग्रेसचे आ. अमीन पटेल यांचा मुकाबला शिंदेसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याशी होत आहे. त्यामुळे काँग्रेस गड राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या परिसरात असंख्य छोटे उद्योग आहेत. त्यामुळे हातगाडीवरून मालाची वाहतूक होते. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली. दलाल इस्टेटचा काही भाग, डोंगरी, मांडवी, मोहम्मद अली मार्ग, नळ बाजार आणि नागपाड्याचा मुस्लिमबहुल भाग या येतो. या मतदारसंघातील भुलेश्वर, कुंभारवाडा, खेतवाडी परिसरात मराठी, गुजराती, जैन, मारवाडी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. शायना एन. सी. यांचा वावर उच्चभ्रू समाजात आहे. त्यामुळे त्यांना मेहनत घ्यावी लागेल, असे म्हटले जाते.
राजकारणातील जुना चेहरा
शायना एन. सी. यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचा राजकारणातला अनुभव दांडगा आहे. त्यांनी अनेक वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
-१०० वर्षांपेक्षा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास.
-मुंबईचे दक्षिण टोक असल्याने कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, ही येथील नागरिकांची मोठी समस्या आहे.
-पाणीकपातीमुळे पुरेसे पाणी मिळणे अशक्यप्राय. अरुंद रस्ते, अतिक्रमणग्रस्त गल्ल्या, वाहनकोंडी, फेरीवाल्यांचे पदपथांवरील अतिक्रमण यांमुळे बकाल अवस्था.