Mumbai: विदेशी दारूचा १ कोटीचा साठा जप्त, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 05:25 PM2023-09-02T17:25:35+5:302023-09-02T17:26:12+5:30
Mumbai Crime News: गोवा राज्यात निर्मित झालेली दारू घेऊन छुप्या मार्गाने महाराष्ट्र विक्रीसाठी आलेल्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचा १ कोटीचा साठा जप्त करण्यात आला असून तिघांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
- श्रीकांत जाधव
मुंबई - गोवा राज्यात निर्मित झालेली दारू घेऊन छुप्या मार्गाने महाराष्ट्र विक्रीसाठी आलेल्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचा १ कोटीचा साठा जप्त करण्यात आला असून तिघांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला वसई - दिवा रेल्वे ब्रिजजवळील हॉटेल वेलकमच्या बाजूला परराज्यातील विदेशी दारूची छुप्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचला होता. त्यात एका संशयित वाहनाची पथकाने तपासणी केली असता त्या वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित झालेला आणि महाराष्ट्रात विक्रीकरिता आलेला १२०० बॉक्स इतका दारू दारूसाठा आढळून आला.
या कारवाईत संबंधित ३ जणांना अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच ट्रक कंटेनर क्रं एच आर - ५५ डब्लू १४०२ या वाहनासह एकूण १ कोटी १६ लाख ४५ हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई भरारी पथक राज्याचे निरीक्षक विजयकुमार थोरात आणि रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अशोक तारू, स दु. निरिक्षक रवी पाटील, जवान प्रवीण धवणे, सोमनाथ पाटील, कीर्ती कुंभार या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील शोध दुय्यम निरीक्षक अशोक तारु घेत आहे.