मुंबई: राज्यातील 100 कोटींच्या खंडणी प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे. अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर अनिल देशमुखांना या खंडणीच्या आरोपात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. शिवाय राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची नेमणूक केली आहे.
पैशांची मागणी कधीच केली नाहीआज चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझेने जबाब नोंदवला. यावेळी अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली. यावेळी सचिन वाझेने अनिल देशमुख अथवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असे म्हटले. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले. आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली आहे.
निलंबनाच्या काळातही मी तपास कार्य करायचोमाजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. त्यावेळी त्यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी सचिन वाझेला काही प्रश्न केले. त्यांच्या उत्तरात सचिन वाझे म्हणाला की, निलंबनाच्या काळात मी मुंबई पोलीस मुख्यालयाशी संलग्न होतो; पण जणू काही मी सेवेत आहे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे मी करीत असे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी माझी मदत घेतली होती. तसे मी मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या निर्देशांवरून केले होते, असेही वाझेने स्पष्ट केले होते.