राहण्यायोग्य शहरांच्या यादीत मुंबई दहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:06 AM2021-03-05T04:06:58+5:302021-03-05T04:06:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दाटीवाटीच्या वस्त्या, कचरा, वाहतूक कोंडी अशा असंख्य समस्या पावलोपावली भेडसावत असतानाही मुंबईने देशातील राहण्यायोग्य ...

Mumbai 10th in the list of livable cities | राहण्यायोग्य शहरांच्या यादीत मुंबई दहावी

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत मुंबई दहावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दाटीवाटीच्या वस्त्या, कचरा, वाहतूक कोंडी अशा असंख्य समस्या पावलोपावली भेडसावत असतानाही मुंबईने देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १११ शहरांचे सर्वेक्षण करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मुंबईला दहावा क्रमांक मिळाला आहे. यानिमित्ताने मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्र शासनाने २०१८ पासून देशातील राहण्यायोग्य शहरांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानुसार देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या व त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांना शहरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा, राहण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण, विकासकामे या सर्वांचा आढावा या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतो. गुरुवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई दहाव्या स्थानी, तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.

------------

जानेवारी २०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईला ही श्रेणी मिळाली आहे. मात्र कोविड काळात महापालिकेने केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरावर कौतुक झाले आहे. त्याचबरोबर 'इज ऑफ लिव्हिंग' साठी महापालिकेने अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानुसार गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सांडपाणी प्रक्रियेसाठी सात केंद्र, समुद्राचे पाणी गोड करणे आणि वीजनिर्मितीचेही महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे लोकांचे निश्चितच मतपरिवर्तन होईल. त्यामुळे पुढच्या वर्षी मुंबईचा क्रमांक निश्चितच अव्वल स्थानी असेल.

- इकबाल सिंह चहल (आयुक्त, मुंबई महापालिका)

.......................

मुंबइमधील सुविधा पुढीलप्रमाणे

- पालिका रुग्णालयांत रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीचे उपचार

- मुंबई विद्यापीठ आणि अन्य विद्यापीठांच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा.

- सुशोभित उद्यानांसह मनोरंजनाच्या सर्वाधिक सुविधा पुरविणारे शहर.

- बस, रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीची सर्वोत्तम सुविधा.

- दाट वस्तीचे शहर असल्याने स्वच्छतेला प्राधान्य.

- वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी तुटवड्यावर मात करण्याचा प्रयत्न.

- रोगराई पसरू नये यासाठी वेळोवेळी जंतुनाशकांच्या फवारणीसह अन्य खबरदारी.

Web Title: Mumbai 10th in the list of livable cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.