- संतोष आंधळेमुंबई - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या १६ मेडिकल कॉलेजेसमध्ये अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यासाठी विभागाने ११४ कोटी ६६ लाखाच्या खर्चास मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्या १६ मेडिकल कॉलेजेसमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक जुन्या या कॉलेजसमध्ये अत्याधुनिक शास्त्रकिया करण्यासाठी नवीन थिएटर तयार करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. या सर्व गोष्टीचा फायदा रुग्णसेवेस मिळणार आहे.
वैद्यकीय विश्वात गेल्या काही वर्षात मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीने ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांचा भर लॅप्रोस्कोपिकली शस्त्रक्रिया करण्यावर दिला जात आहे. या शस्त्रक्रियेमुळे कमी प्रमाणात रक्त येते. तसेच रुग्ण लवकर प्रमाणात बरा होऊन घरी जातो. त्यामुळे आता या अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया काळाची गरज झाली आहे. मात्र अनेक या जुन्या वैद्यकीय महाविद्यलयात या अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया व्हाव्यात यासाठी शासनाने चांगली थिएटर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जे जे रुग्णालयात अशा पद्धतीचे ऑपरेशन थिएटर बनविण्यात आले आहे.
या ठिकाणच्या मेडिकल कॉलेजचा समावेश छत्रपती संभाजीनगर, लातूर, मिरज, सांगली, कोल्हापूर, बारामती, नागपूर येथील २ कॉलेज, चंद्रपूर, जळगाव, अकोला, यवतमाळ, नांदेड, अंबाजोगाई आणि धुळे येथील मेडिकल कॉलजेचा समावेश आहे.
याप्रकरणी, एका शल्य चिकित्सा विभागातील प्राध्यापकाने सांगितले कि, " मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सध्या ही काळाची गरज आहे. कारण भविष्यात लॅप्रोस्कोपीच्या पुढील शस्त्रक्रिया येणार आहेत. खासगी रुग्णायात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत. येत्या काळात अशाच पद्धतीच्या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णलयात पण सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी आताच पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.