मुंबई: कॉपी करताना पकडल्याने आठवीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 09:10 AM2018-03-28T09:10:53+5:302018-03-28T09:10:53+5:30
परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडल्याने आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील पवई भागात घडली आहे.
पवई- परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडल्याने आठवीच्या विद्यार्थिनीनेआत्महत्या केल्याची घटना मुंबईतील पवई भागात घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. रिद्धी जयप्रकाश त्रिपाठी असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. पवईतील एका खासगी हॉस्पिटलमधून 26 मार्च रोजी पवई पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
रिद्धी जयप्रकाश त्रिपाठी ही विद्यार्थिनी तिच्या कुटुंबियांसह पवईतील शिवशक्ती नगरमध्ये राहत होती. कुर्ला येथील सेंट मायकेल हाय स्कूलममध्ये ती इयत्ता आठवीत शिकत होती. 'रिद्धीची परीक्षा 26 मार्च रोजी सुरू झाली होती. पहिला विज्ञान विषयाचा पेपर होता. परीक्षेदरम्यान, मुलीच्या पॅडवर परीक्षेदरम्यान काहीतरी लिहिलेलं आढळलं. रिद्धी कॉपी करताना आढळल्यावर शिक्षिकेने तिला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये जायला सांगतिलं. रिद्धीचा शिक्षिकेने अपमान केला. इतकंच नाही, तर तिला जवळपास एक तासाहून जास्त वेळ मुख्याध्यापक कक्षाच्या बाहेक उभं केलं. यापुढे परीक्षेला बसू देणार नाही, अशी धमकी रिद्धीला दिल्याचा आरोप रिद्धीची आई नितू यांनी केला आहे. 'मिड डे'ला रिद्धीच्या आईने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
26 तारखेला दुपारी परीक्षा देऊन घरी आल्यावर रिद्धीने जेवण केलं व ती झोपायला गेली. त्यानंतर रिद्धीची आई नितूसुद्धा शेजारी जाऊन शिवण कामात व्यस्त झाल्या. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांना दरवाजे, खिडक्या आतून बंद असलेल्या पाहायला मिळाल्या. नितू यांनी अनेकदा दरवाजा वाजवला पण रिद्धीने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून स्क्रु ड्रायव्हर घेऊन खिडकी उघडली. तेव्हा त्यांना रिद्धी छताला लटकलेल्या अवस्थेत दिसली. रिद्धीला खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
स्काऊट गाईडच्या दोरीने रिद्धीने गळफास लावल्याचं रिद्धीच्या आईने सांगितलं. विज्ञानाच्या परीक्षेतील प्रकारामुळे रिद्धी अतिशय तणावात होती, अशी माहिती रिद्धीच्या एका मैत्रिणीने दिली आहे. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वागणुकीमुळे रिद्धीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप रिद्धीच्या पालकांनी केला असून रिद्धीला न्याय मिळवून देण्यासाठी शाळेच्या बाहेक निदर्शनं करण्याच्या विचारात रिद्धीचं कुटुंबिय आहे.