मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील थंडीचा कडाका अद्यापही कायम असून, शुक्रवारी माथेरान आणि मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे १४.२, १६.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विशेषत: रात्रीसह दुपारीही मुंबईत गारे वाहत असून, आता २३ जानेवारीपर्यंत मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान १४ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्रीने अधिक असणार आहे.
२३ जानेवारीपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात २३ जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान हे १४-१६ तर दुपारचे कमाल तापमान २८ राहील. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतकी तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक असु शकतात. विदर्भात २३ जानेवारीनंतर म्हणजे २५ जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
- अहमदनगर १२.४
- अलिबाग १५.२
- छत्रपती संभाजी नगर १२.८
- डहाणू १६.५
- जळगाव ११.३
- कोल्हापूर १६.१
- महाबळेश्वर १२.५
- मालेगाव १३.६
- माथेरान १४.२
- मुंबई १६.९
- नांदेड १७
- नाशिक १२.१
- धाराशीव १७.२
- पालघर १८.६
- परभणी १५.८
- रत्नागिरी १८.२
- सांगली १५.४
- सातारा ११.९
- सोलापूर १७.४