लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गारठलेल्या मुंबईच्या किमान तापमानाचा पारा शुक्रवारी १८.८ अंश नोंदविण्यात आला. तत्पूर्वी मुंबईचे किमान तापमान १५ अंशापर्यंत खाली घसरले होते. मुंबईत गारठा वाढला होता. गेल्या सोमवारपासून मुंबईत थंडीचा ट्रेंड कायम आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
जसजसा नाताळ जवळ आला तसतसे किमान तापमान आणखी खाली येऊ लागले. विशेषतः उत्तर भारतात वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा प्रभावदेखील महाराष्ट्रावर होऊ लागला आणि किमान तापमान आणखी खाली आले. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान एक अंकी नोंदविण्यात येत असून, आणखी आठवडाभर राज्यातदेखील थंडीचा ट्रेंड कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.