मुंबई : मान्सूनने झोडपल्यानंतर आणि ऑक्टोबर हिटने पाठ फिरवल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांना थंडीने चांगलीच चाहूल दिली आहे. या हंगामातील पहिल्या नीचांकी किमान तापमानाची नोंद शनिवारी झाली असून, हे किमान तापमान सांताक्रूझ येथे १९.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांची सकाळ गारे गार झाली असून, शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक गारवा होता. दरम्यान, किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असली तरी कमाल तापमान मात्र स्थिर आहे. त्यामुळे दिवसा मुंबईकरांना किंचित चटके बसत आहेत.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील किमान तापमानात चांगलीच घट नोंदविण्यात आली आहे. सांताक्रूझ येथे १९ आणि पनवेल येथे १४ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. आता जसे जसे दिवस सरत जातील तस तसे किमान तापमानात आणखी घट होईल. आणि मुंबईकरांना आणखी थंडी भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचा विचार करता महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी किमान तापमान खाली घसरले असून, राज्याला देखील थंडी भरत आहे.
मुंबई आणि परिसरात शनिवारी सकाळी तापमानात घट नोंदविण्यात आली आहे. उपनगरात तापमानात अधिक घट नोंदविण्यात आली आहे. उपनगरात थंडीचा प्रभाव अधिक आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते