मुंबई : सीमाशुल्क कस्टम अधिका-याला लाच देणे दोघांना भलतेच महागात पडले आहे. सीबीआयने दोघांनाही लाच देताना रंगेहात पकडले व बेड्या ठोकल्या. हिमांशू अजमेरा आणि कस्टम ब्रोकर मानव जगरवाल अशी त्यांची नावे आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सहायक आयुक्तांच्या तक्रारीवरून सीबीआयने शनिवारी सकाळी ही कारवाई केली. सीमाशुल्क विभागाने सीएसएमटी येथून मोबाइल सामानाचा टेम्पो जप्त केला. त्यामध्ये जवळपास ४ कोटी किमतीच्या सामानाची तस्करी करण्यात आल्याचे दिसून आले. अॅविस्टा मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक राजेंद्र सिंग राजपुरोहित यांनी तो टेम्पो त्यांचा भाऊ अजमेराचा असल्याचा दावा केला. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
त्यानंतर, कंपनीच्या नावाने कस्टम ब्रोकर जगरवालने कस्टम अधिका-यांची भेट घेतली आणि तडजोड करण्यासाठी पैशांची आॅफर दिली. अधिका-याने ही बाब सीबीआयच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार, शनिवारी सीबीआयने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे अजमेरा आणि जगरवाल अधिका-याला लाच देण्यासाठी कार्यालयात धडकले. त्याच दरम्यान सीबीआयने त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. तेथूनही महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.