मरोळ मासळी बाजारच्या 200 कोळी महिला बनल्या स्वच्छता दूत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 08:25 AM2018-07-26T08:25:41+5:302018-07-26T08:25:49+5:30
हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता दूत बनून त्यांनी हा मासळी बाजार चकाचक केला.
- मनोहर कुंभेजकर
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्याचे देशवासियांना आवाहन केले असताना गेली 3 महिन्यांपासून वारंवार सांगूनसुद्धा पालिकेच्या के (पूर्व )वॉर्ड कडून अंधेरी पूर्व येथील मरोळ मासळी बाजराची स्वच्छता करण्यात आली नाही! तर पालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षांनीही या बाजाराकडे पाठ फिरवली. परिणामी येथील सुक्या मासळी बाजारातील 200 कोळी महिलांनी अखेर पालिकेची वाट न बघता त्यांनी चक्क हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता दूत बनून त्यांनी हा मासळी बाजार चकाचक केला. अंधेरी (पूर्व) मरोळ येथे पुरातन सुक्या मासळीचा बाजार आहे. दर शनिवारी येथे सुक्या मासळीचा बाजार भरतो. मुंबईतील वेसावे,मढ,भाटी,मालवणी,मनोरी,गोराई,खारदांडा,वरळी, कुलाबा सह ठाणे जिल्ह्यातील वसई,अर्नाळा,उत्तन,डोंगरी या विविध भागातून सुकी मासळी येथे मोठ्या प्रमाणात विक्रीला येते.तर दर बुधवारी रात्री गुजराथ वरून देखील सुकी मासळी विक्रीला येते.
मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या.सभासदांचा विजय असो,भारत स्वच्छ आमची मुंबई स्वच्छ....आमचा मरोळ मासळी बाजार स्वच्छ ठेवा अशा जोरदार घोषणा देत मरोळ बाजार कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या 200 सभासद कोळी महिलांनी हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथे स्वच्छता मोहीम नुकतीच प्रभावीपणे राबवली. राजेश्री भानजी यांनी आवाहन केले की,आम्ही मुंबई चे मूळ निवासी भूमीपुत्र असून एक जागरुक नागरिक म्हणून आमचा मासळी बाजार आपण स्वतः स्वच्छ व साफ ठेवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. कडाख्याचा पाऊस असून देखिल व शनिवार सारखा मासळी विक्रीचा हाट बाजाराचा सुकी मासळी विक्रीच्या व कमाईच्या दृष्टीने प्रमुख दिवस असून देखील बाजारातील महिला सभासदांनी स्वच्छतेला प्रथम महत्त्व देत मरोळ बाजार परिसर स्वच्छ व चकाचक केला. घाणीमुळे बाजारात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली होती. ज्यामुळे मासळी विक्रेत्या कोळी महिला व येणारे ग्राहक सगळ्यांनाच सामना करावा लागत होता. मुंबई महानगर पालिकेची वाट न पाहता या कोळी महिलांनी मुंबईचे जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. येथील कोळी महिला पर्यावरण विषयी खूप जागरूक आहेत. या बाजाराच्या गटाराचा मोठा नाला वाहतो, तरी कळत न कळत बाजारातील घणकचरा, प्लास्टीक, थर्माकोल नाल्या मार्गे वाहून आमचा समुद्र-खाड्या प्रदुषित होऊ नये व प्लास्टिक -थर्माकोलमुळे समुद्रातील मासळी व इत्तर जलचरांना हानी पोहचू नये हा सुद्धा महिलांचा प्रमुख हेतू होता. मोहीम चळवळ राबवण्या मागे आमचा मूळ हेतू होता अशी माहिती राजेश्री भानजी यांनी लोकमत ला दिली. या मोहीमेत वर्सोवा बीच क्लिनिग चे जनक अँड. अफ्रोज शाह यांनी देखील येथील कोळी महिलांना मार्गदर्शन करून आपला बाजार स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.तसेच येथील स्वच्छता मोहिमे करीता कोळी महिलांना विनामूल्य हाथ मोजे - हँन्ड ग्लोज यांचे वाटप अफ्रोज शाह यांच्या टिमने केले.
इतिहास मरोळ बाजाराचा
पूर्वी गावात तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातील एक दिवस बाजार भरत असे आणि मग आठवडी बाजार किंवा आठवडे बाजार संकल्पना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखिल स्वातंत्र्य पूर्व काळापासून राबवली जाऊ लागली. मुंबईत अंधेरी (पूर्व) रेल्वे स्थानकापासून सुमारे 4 किमी अंतरावर डाव्या बाजूला आणि जे.बी.नगर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या जवळ येथे दर शनिवारी मरोळ येथे सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो.स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईतील एका पारसी गृहस्थाने मरोळ येथील त्याच्या मालकीची जागा कोळी बांधवांना सुक्या मासळीची बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेकडे सुपूर्द केली होती. तेव्हापासून नऊ हजार ६०० चौरस मीटर जागेत सुक्या मासळीचा बाजार भरतो.येथे या घाऊक व किरकोळ मासळी बाजारात खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांची मोठी गर्दी असते.
1930 पासून हा बाजार सुक्या मासळीच्या विक्रीसाठी असला तरी,आजही मॉल संस्कृतीत हा बाजार टिकून आहे.मात्र बाजाराला सभोवलताचा परिसर अतिक्रमणाने ग्रासला आहे. शिवसेनाप्रमुख व कोळी बांधव हे जिव्हाळ्याचे नाते होते. 1999 ते 2000 साली येथे बाजारच्या नावाखाली टॉवर उभा करण्याचा घाट घातला होता.त्यावेळी वेसाव्याचे दिवंगत रामचंद्र खर्डे यांनी ही बाब शिवसेनाप्रमुखांच्या कानावर घेतली असता त्यांनी याकडे जातीने लक्ष देण्याचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांना सांगितले. आणि मग येथे टॉवर उभारण्याचा प्रस्ताव अखेर बारगळला.