मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मेट्रो प्रशासनाची काम जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. साप आढळून आल्याचे अनेक कॉल सर्पमित्रांना मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली, तसेच ‘सप्रेडिंग अवेयरनेस ऑन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) संस्थेने नुकताच तीन महिन्यांचा ‘बिग ४’चा अहवाल सादर केला असून, शहर व उपनगरातून १६० नाग, ३७ घोणस, ६ मण्यार असे एकूण २०३ विषारी साप रेस्क्यू केले.
सर्प संस्थेने विषारी सापांचा म्हणजेच बिग फोर अहवाल सादर केला आहे़ यात मुंबई शहरासह उपनगरातून ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत ६३९ विषारी व बिन विषारी सापांची सुटका करण्यात आली आहे. १४ सस्तन प्राणी ताब्यात घेण्यात आले असून, यात घोरपड, खार, मोठा सरडा (इक्वाना) इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे, तर १६ पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, पोपट, घुबड व शिकरा इत्यादी पक्षी रेस्क्यू करण्यात आले. भायखळा, चेंबूर, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, वसई-विरार या ठिकाणाहून सर्वाधिक बिग ४ साप पकडण्यात आले, अशी माहिती सर्प संस्थेचे सर्पमित्र चित्रा पेडणेकर यांनी दिली.
देशभरात प्रामुख्याने चार विषारी साप आढळून येतात. त्यांना ‘बिग ४’ म्हटले जाते. सध्या मुंबईत अनेक विकासकामे सुरू असून, तेवढीच खोदकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे सरपटणारे प्राणी मोठ्या संस्थेने बाहेर पडू लागले आहेत. एखादा साप आढळून आल्यास नागरिकांनी त्यांच्या जवळ जाणे शक्यतो टाळावे, तसेच त्याच्यावर नजर ठेवावी आणि त्वरित सर्पमित्र, प्राणिमित्र संस्था व संघटना, अग्निशमक दल यांना सूचित करावे, अशी माहिती ‘सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाइल्स अँड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे यांनी दिली.
१४ फुटांचा अजगर
वांद्रे रोड येथील कलानगर परिसरातून शनिवारी दुपारी १४ फुटांचा अजगर सर्पमित्रांनी ताब्यात घेतला. अजगर हा मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांना दिसून आला होता. त्यावेळी प्रदीप रजक यांनी सर्प संस्थेला संपर्क करून माहिती दिली. दरम्यान, संस्थेचे सर्पमित्र भागेश भागवत आणि शेलडॉन डिसोजा हे सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अजगराला ताब्यात घेतले. सापाची प्रकृती स्थिर असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.