नियम तोडल्याने २८० लायसन्स रद्द? नियम पाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:46 AM2022-04-18T11:46:14+5:302022-04-18T11:46:26+5:30
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी, विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू असताना, आता विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणारे वाहनचालकही आयुक्त संजय पांडे यांच्या रडारवर आले आहेत. वारंवार बजावून देखील नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या २८० जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओ विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे वेळीच सावध होत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी, विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वी आयुक्तांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर, तर आता बेदरकारपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरात ५ हजाराहून अधिक खटारा हटविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विना हेल्मेटवरील कारवाईचा वेग वाढत असून दिवसाला १०० ते १५०० जणांवर कारवाई सुरू आहे.
शुक्रवारी २४ तासात १२१९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांविरोधात १८३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक २ हजार २७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येत आहेत. यामध्ये चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांपैकी ९४, तर विना हेल्मेट कारवाईतील १८६ जणांचे परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आरटीओ विभागाकडून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.