मुंबईत दीड महिन्यात म्युकरमायकोसिसचे २९८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:01+5:302021-09-03T04:06:01+5:30
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असले तरीही या संसर्गाचा धोका टळलेला ...
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाले असले तरीही या संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे उपचार घेताना वा कोरोनामुक्तीनंतरही काळ्या बुरशीचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. शहर उपनगरात गेल्या दीड महिन्यात म्युकरमायकोसिसचे २९८ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ७४ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
मुंबईत म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांची संख्या ९१८ वर पोहोचली आहे. त्यातील १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५५१ रुग्ण बरे झाले असून, १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत १३ जुलैला म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण ६२०, तर १०४ रुग्ण दगावले होते. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णांचा आकडा ९१८वर पोचला, तर १७८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण आकडेवारी पाहिली तर केवळ दीड महिन्यात २९८ रुग्णांची भर पडली, तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दीड महिन्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण ३२ टक्के, तर मृत्यूचा आकडा ४० टक्क्यांनी वाढला आहे.
यांना म्युकरचा सर्वाधिक धोका
अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्ती, रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींवरही बुरशी हल्ला करते. कोरोनामुळे प्रतिकारशक्ती खालावत असल्याने अशा बाधित रुग्णांना या आजाराचा धोका वाढला आहे. यातही महिलांपेक्षा पुरुषांना हा आजार अधिक होतो.
कमी वेळात गंभीर संसर्गाचा धोका
म्युकरमायकोसिस अत्यंत दुर्मीळ आजार आहे. कर्करोगाचे तीन टप्पे असतात. एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यावर जायला किमान एक महिना लागतो. परंतु, म्युकरमायकोसिसचे चार टप्पे आहेत. अवघ्या पाच दिवसांत रुग्ण एकेक टप्पा ओलांडत पुढच्या टप्प्यात म्हणजेच अति जोखमीत पोहोचतो. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचतो. पहिले ७२ तास म्हणजे तीन दिवसांत हा आजार औषधांवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. बुरशी शरीरात पसरत जाऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. दुसऱ्या टप्प्यापर्यंत कान, नाक, घसा तज्ज्ञ रुग्णावर शस्त्रक्रिया करू शकतात. डोळ्यात बुरशी पोहोचली तर नेत्रविकार तज्ज्ञ पुढील उपचार करतात.