मुंबई- मुंबई जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होत असून मुंबई यादीत चौथ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी याच यादीमध्ये मुंबई शहर पाचव्या स्थानी होतं. पण हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आता पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालातील जगातील 859 सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचं स्थान 63वं आहे. मुंबईतलं प्रदूषण हे बिंजिंगपेक्षाही अधिक आहे अशी धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे.
याच चाचणीत दिल्ली क्रमांक एक म्हणजे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीपाठोपाठ, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या 4 प्रदूषित शहरांची नावं आहेत. त्यामुळे, जगातील दर 10 माणसांपैकी 9 लोक प्रदूषित हवेनं श्वासोच्छवास करत असल्याचा उल्लेख या अहवालात आहे.
प्रदूषित शहरांच्या यादीत वाढत चाललेली भारतीय शहरांची नावं ही एक प्रकारे धोक्याची घंटाच आहे. ज्या देशांतील माणसांचं सरासरी आर्थिक उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना नाहीत अशा देशांना प्रदूषणाचा विखाळा बसतोय यात भारतासह आफ्रीका खंडातील देशांचांही समावेश आहे. दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. तसंच वायू प्रदूषणामुळे हृदयासंबंधीच्या समस्या, श्वसन रोग यासरख्या समस्यांमध्येही वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.