खेळताना तोल जाऊन ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; ११व्या मजल्याच्या खिडकीतून पडला खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:51 PM2022-07-11T18:51:42+5:302022-07-11T18:52:24+5:30
मुलगा बेडरूममध्ये खिडकीजवळ खेळत होता
Small Kid Mumbai News: मुंबईतील भायखळा विभागात सोमवारी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. घरात खेळताना एका पाच वर्षीय मुलाचा बिल्डिंगवरून खाली पडून मृत्यू झाला. घरात लहान मुल असताना त्यांच्यावर अतिशय बारीक लक्ष ठेवावं लागतं. पण असं असूनही भायखळ्यात हा दुर्दैवी प्रकार आज घडला. मुंबईतील भायखळा परिसरात एक मुलगा खेळता खेळता इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
मुंबईतील भायखळा परिसरातील एका उच्चभ्रू परिसरात हा वाईट प्रकार घडला. एका हाय-प्रोफाईल परिसरात उंच इमारत असलेल्या ठिकाणी सोसायटीत ही घटना घडली. इमारतीच्या ११व्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा बेडरूममध्ये खेळत होता. खेळता खेळता हा मुलगा खिडकीतून थेट खाली पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा खिडकीच्या अगदी जवळच छत्रीसोबत खेळत होता. तो खेळत असताना नक्की काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण त्याचवेळी ही दुर्घटना घडली. खेळता-खेळता इमारतीवरुन तो चिमुरडा खाली कोसळला.
आग्रीपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा परिसरात असलेल्या पवित्र मार्ग येथील जनता सहकारी सोसायटीत ही घटना घडली. हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत उंच इमारतीत राहत होता. इमारतीच्या ११व्या मजल्यावरील आपल्या अपार्टमेंटमधील बेडरूममधील खिडकीजवळ तो एकटाच खेळत होता. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाची आई आपल्या नातेवाईकांसोबत गप्पा मारत होती. त्याच वेळी हा मुलगा बेडरूम मधील खिडकीतून खाली वाकून पाहू लागला. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो खिडकीतून खाली पडला. बेडरूममधील या खिडकीला कुठल्याही प्रकारची सेफ्टी ग्रील नव्हती आणि त्यामुळेच हा चिमुकला खाली पडला. खिडकीतून पडलेला मुलगा खाली उभ्या असलेल्या स्कूटरवर पडला आणि त्यानंतर रस्त्यावर पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.