जेजे कर्मचाऱ्याच्या निवासस्थानासाठी ५०० कोटी, गगनचुंबी टॉवर उभे करणार

By संतोष आंधळे | Published: March 25, 2024 08:14 PM2024-03-25T20:14:51+5:302024-03-25T20:14:51+5:30

Mumbai News: वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्त्यारीत ग्रांट मेडिकल कॉलेज आणि त्याला संलग्न असलेले जे जे रुग्णालय आहे. हे महाविद्यालय आणि रुग्णालय १८० वर्षापेक्षा अधिक जुने आहे. त्या रुग्णालयाच्या परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असून ती अत्यंत जुनी आणि जीर्ण अवस्थेत आहेत.

Mumbai: 500 crore, JJ will build a skyscraper for employee accommodation | जेजे कर्मचाऱ्याच्या निवासस्थानासाठी ५०० कोटी, गगनचुंबी टॉवर उभे करणार

जेजे कर्मचाऱ्याच्या निवासस्थानासाठी ५०० कोटी, गगनचुंबी टॉवर उभे करणार

- संतोष आंधळे
मुंबई -  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अख्त्यारीत ग्रांट मेडिकल कॉलेज आणि त्याला संलग्न असलेले जे जे रुग्णालय आहे. हे महाविद्यालय आणि रुग्णालय १८० वर्षापेक्षा अधिक जुने आहे. त्या रुग्णालयाच्या परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असून ती अत्यंत जुनी आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी काहींना काही डागडुजी करावी लागते. तर काही इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व निवास्थानाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी विभागाने ५०४ कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच त्या ठिकाणी गगनचुंबी टॉवर उभे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जे जे रुग्णालय आणि कॉलेज बांधले गेले त्यावेळी या ठिकाणी काम करणाऱ्या वर्ग १ ते वर्ग ४ मधील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी आणि कर्मचारी यांना परिसरातच राहता यावे, याकरिता या ठिकाणी निवासस्थाने बांधून दिली गेली होती. त्यामुळे कुठलीही इमर्जन्सी आली तरी सर्व कर्मचारी वर्ग हा तात्काळ कामावर हजर राहत होता. कालांतराने कर्मचारी वर्गात मोठ्या संख्यात वाढ झाली त्यामुळे काही कर्मचारी अधिकारी आणि परिचारिका रुग्णालय परिसराच्या बाहेर राहण्यास गेला. तरी सध्याच्या स्थितीत वर्ग ३ आणि वर्ग ४ चा ९० टक्के कर्मचारी वर्ग या ठिकाणी राहत आहे. तर वर्ग १ आणि वर्ग २ चा ५० टक्के कर्मचारी वर्ग या ठिकाणी राहत आहे.

सध्याच्या घडीला असणारी रुग्णालयात परिसरातील निवासस्थाने ७० वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या काही वर्षात या ठिकाणच्या बऱ्याच इमारतीना भेगा पडल्या आहेत. काही ठिकणी पडझड झाली आहे. तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी गाळात असल्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत असतो. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी या ठिकाणी डागडुजी करत असते. तसेच मलनिःसारण लाईन सुद्धा खूप जुनी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी गटारे तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. काही इमारती इतक्या जुन्या आणि वाईट अवस्थेत आहेत कि त्या पाडून नवीन इमारती उभारणे गरजचे झालेले आहे.

गगनचुंबी इमारतीत राहणार कर्मचारी
या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने या सर्व निवास्थानाचा आढावा घेतला. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी जुन्या इमारती पाडून नवीन गगनचुंबी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी ५०४ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारती बांधताना पुढच्या ५० वर्षाचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार वर्ग १ आणि २ साठी ३५ माळ्याचे दोन टॉवर आणि त्यासारखेच वर्ग ३ आणि ४ साठी ५ ते ६ टॉवर बांधण्यात येणार आहे.

४५ एकर मध्ये कॅम्पस
जे जे रुग्णालय ४५ एकर पेक्षा परिसरात पसरलेलं आहे . या ठिकणी १०० पेक्षा अधिक इमारती आहेत. त्यामध्ये अनेक इमारती या ब्रिटिशकालीन आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या काही विषयासाठी या ९ ते १०  स्वतंत्र इमारती आहेत. रुग्णालय इमारत, ओ पी डी बिल्डिंग, ब्लड बँक, नर्सिंग बिल्डिंग, नर्सिंग कॉलेज इमारत, ७-८ विद्यार्थी राहत असलेल्या इमारती, वर्ग ३ आणि ४ च्या सहा ब्लॉक, डॉक्टरांच्या सहा ते आठ इमारती, नवीन प्रशासकीय भवन, नव्याने येणारे सुपरस्पेशालिटी रुग्णालय, या आणि अशा अनेक इमारती या कॅम्पस मध्ये आहेत.

Web Title: Mumbai: 500 crore, JJ will build a skyscraper for employee accommodation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.