Mumbai: आठ दिवसांत काढले वीजजोडणीचे ५१ हजार अनधिकृत आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 07:14 PM2022-04-30T19:14:22+5:302022-04-30T19:15:04+5:30
Unauthorized Electricity Connection: अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले.
मुंबई - वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४००० ते २४५०० मेगावॅटपर्यंत गेली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले.
महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी महावितरणच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची नुकतीच ऑनलाईन बैठक घेऊन वीजचोरी करणाऱ्या तसेच अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले. प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
२१ एप्रिल ते २८ एप्रिल या आठ दिवसांत अनधिकृत वीजवापरासाठी वीजतारांवर टाकलेले ५१ हजार ५९७ आकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढले आहेत. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस वायर, केबल, स्टार्टर आदी साहित्यही महावितरणने जप्त केले आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडलात ४९६७, लातूर परिमंडलात ३८४८, नांदेड परिमंडलात ९०३०, कल्याण परिमंडलात ४१७८, भांडूप परिमंडलात ३३, नाशिक परिमंडलात ९३१६, जळगाव परिमंडलात ४७९०, नागपूर परिमंडलात २२१, अमरावती परिमंडलात १२००, चंद्रपूर परिमंडलात २९७, गोंदिया परिमंडलात ७१७, अकोला परिमंडलात १८९७, बारामती परिमंडलात ८९१९, पुणे परिमंडलात ९२३ तर कोल्हापूर परिमंडलात १२६१ आकडे काढण्यात आले.
या मोहिमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. राज्यभर २४८५ वीजवाहिन्यांवरील जवळपास १९२ मेगावॅट वीजभार कमी झाला आहे. तसेच या मोहिमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होऊन भारनियमनाची तीव्रताही कमी झाली आहे.