Mumbai: अग्निशमन दलाच्या ७ जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:24 PM2023-04-18T12:24:43+5:302023-04-18T12:25:00+5:30
मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जणांना जाहीर झालेले अग्निशमन सेवा पदक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आले.
मुंबई : मुंबईअग्निशमन दलाच्या सात जवानांना जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जणांना जाहीर झालेले अग्निशमन सेवा पदक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी सुरक्षा व गृहरक्षक महासंचालनालयाचे महासंचालक ताज हसन यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदक प्रदान सोहळा पार पडला. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या वायू गळतीवेळी प्रसंगावधान राखून नागरी संरक्षणाची उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना शौर्य पदक तर चार जवानांना विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान करण्यात आले. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी दहा मेट्रिक टन क्षमतेच्या द्रवरूप इंधन वायू (एलपीजी) च्या साठवण टाकीतून गळती सुरू झाली होती. वायूच्या टाकीजवळ रुग्णालयातील कक्षात विविध रुग्ण उपचार घेत होते. वायुगळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ५८ रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सामग्रीसह सुरक्षित ठिकाणी हलविले. .
यांचा केला गौरव
विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगावकर, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल विश्वासराव, केंद्र अधिकारी दीपक जाधव, केंद्र अधिकारी सागर खोपडे, प्रमुख अग्निशामक संजय गायकवाड, अग्निशामक संजय निकम, अग्निशामक गणेश चौधरी या सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले तर विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कराडे, प्रमुख अग्निशामक दत्तात्रय पाटील, यंत्रचालक संदीप गवळी, सहायक कार्यदेशक गुरुप्रसाद सावंत यांना अग्निशमन सेवा पदक बहाल करण्यात आले आहे.