मुंबई - मुंबईतील वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या, हाय रिस्क गटातील संशयीतांचे क्वारंटाईन आणि विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करणा-या वैद्यकीय कर्मचा-यांच्या वास्तव्यासाठी जागेची आवश्यकता दिवसागणीक वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई- ठाण्यातील बजेट हॉटेल असोसिएशनने आपली मोक्याच्या ठिकाणी असलेली ७० हॉटेल्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून या ७० हॉटेल्समधिल सर्व खोल्या मुंबई आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अश्रफ अली यांनी दिली. २३ एप्रिल रोजी असोसिएशनच्या पदाधिका-यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. यापैकी काही हॉटेल्स महापालिकेने ताब्यात घेतली असून त्यात आयसोलेशन वॉर्ड करण्याचं काम सुरू केले आहे. तर, ठाण्यातील टाईम स्वेअर या हाँटेलसह मुंबईतील पाच ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांच्या वास्तव्याची सोय करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य अब्दुल सलाम यांनी दिली. या ठिकाणी वास्तव्याला असलेले कर्मचारी, रुग्ण आणि क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या जेवणाची सोयही असोसिएशनच्यावतीने केली जात आहे.