Join us

मुंबईत ७ महिन्यांत ८५ बळी

By admin | Published: September 13, 2016 3:24 AM

मुंबईतील महामार्गांवरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, या वर्षात आतापर्यंत ८५ बळी गेले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वाहन चालकांचा प्रवास धोक्याचा ठरत आहे

मुंबई : मुंबईतील महामार्गांवरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, या वर्षात आतापर्यंत ८५ बळी गेले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वाहन चालकांचा प्रवास धोक्याचा ठरत आहे. सात महिन्यात तब्बल १ हजार ३२४ अपघात झाले असून यात ४५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त मार्गावरील प्रवासही जीवघेणा ठरत असून वाहन चालकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले आहे.वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियम मोडले जातात आणि नियम मोडताना त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मुंबई शहर व उपनगरात अधिक आहे. त्यामुळे या गुन्ह्याखाली होणारी कारवाईही अधिक असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. त्यासाठी विशेष मोहीमही घेतली जाते. तरीही वाहन चालकांकडून नियम हे मोडले जातात आणि अखेर वाहन चालकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त मार्गावरू जाताना तर वाहनांचे बरेच अपघात होत असून यामध्ये बेदरकार आणि दारू पिऊन वाहन चालवल्याने अनेक अपघात होत असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर तर २0१६मध्ये जुलैपर्यंत १,३२४ अपघात झाले असून त्यात ४५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. प. द्रुतगती मार्गावरील प्रवास धोक्याचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालवून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. वाहनांची गर्दी नसते तेव्हा वेग जास्त असतो आणि अपघात होतात ही बाब या मार्गावर निदर्शनास आली आहे. तर पूर्व मुक्त मार्गावर ओव्हरटेक केल्याने अपघात होतात. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील तिन्ही महामार्गांवरील वाहतुकीची रचना चुकीची आहे. त्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. सुरक्षेचे उपाय नसल्याने यात तर पादचाऱ्यांचाही नाहक बळी जातो. या सर्व मार्गांवर योग्य वाहतूक रचना करताना सुरक्षेचे उपायही योजले पाहिजे. तेव्हाच अपघात थांबतील. - सुधीर बदामी (वाहतूक तज्ज्ञ)कठोर कारवाईमुळे शिस्त लागण्याची आशावाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी दंडात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. दुचाकीस्वार विना हेल्मेट असल्यास ५00 रुपये दंड तर बेदरकारपणे वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जात आहे. मुंबईत तरुणांमध्ये रेसिंगचे प्रमाण अधिक असून त्याला जरब बसावी यासाठी तब्बल दोन हजार रुपये दंड ठोठावला जात आहे. वाढीव दंडामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होतानाच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.