मुंबई - मुंबापुरीमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये महिला अत्याचारांमध्ये 85 टक्क्यांनी वाढ झालीय. चालू वर्षांत (जानेवारी 2018 ते जून 2018) महिला अत्याचारासंबंधीच्या 3,047 प्रकरणांची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहरात दर दिवशी दोन महिलांवर बलात्कार तर 9 महिलांचे विनयभंग होतात. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, 2012 पासून बलात्कार, विनयभंग, अपहरण, हत्या, सासरच्या मंडळींकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होत गेली आहे. 2012मध्ये महिला अत्याचारासंबंधी 1 हजार 649 इतक्या घटना दाखल करण्यात आल्या होत्या.
2017 मध्ये 4,356 पैकी 20 टक्के बलात्काराचे तर 12, 238 पैकी जवळपास 15 टक्के विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, मुंबईमध्ये एकूण 5,425 गुन्हेगारीचे खटले नोंदवण्यात आले आहेत. यावर मुंबईचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही स्वतंत्र महिला कक्षा स्थापन केलं आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंबंधीच्या समस्या सोडणे हे आमचे प्राधान्य आहे. महिलांच्या तक्रारींची आम्ही गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं खटले दाखल करतो. निर्भयपणे खटल्यांचा अहवालही सादर केला जातो.
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वाढत्या महिला अत्याचाराविरोधात म्हटले आहे की, जनजागृती मोहीमेतून महिलांना गुन्ह्यांविरोधात आवाज उठवण्यास प्रोत्साहन देणे, सुरक्षित वातावरण तयार करणे या बाबी महत्त्वपूर्ण आहे. समाजाचा एक भाग म्हणून महिला सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.