सायबर ठगाच्या टास्कने केले तरुणाचे खाते रिकामे
By मनीषा म्हात्रे | Published: January 22, 2024 06:36 PM2024-01-22T18:36:11+5:302024-01-22T18:36:37+5:30
Mumbai Crime News: हॉटेल, रेस्टॉरंटला रिव्हयूव देण्यासह विविध टास्कच्या नावाखाली धारावीतील तरुणाचे खाते रिकामे झाले आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मुंबई - हॉटेल, रेस्टॉरंटला रिव्हयूव देण्यासह विविध टास्कच्या नावाखाली धारावीतील तरुणाचे खाते रिकामे झाले आहे. याप्रकरणी देवनार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
धारावी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाच्या तक्रारीनुसार, ६ जानेवारी रोजी त्याला टेलीग्राम आयडीवरून सतिश कुमार नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यामध्ये हॉटेल गुगलवर जावून रिव्हयूव केल्यास प्रत्येकी ५० रुपये देणार असल्याचे सांगितले. त्याने विश्वास ठेवून होकार दिला. सुरुवातीला तीन हॉटेलची नावे पाठवले. हॉटेलच्या नावावर रिव्हयूव केला होता. त्याचे स्क्रिनशॉट काढून पाठवले. त्यानंतर आणखीन काही हॉटेलची नावे पाठवली. त्यानुसार, ३०० रुपये खात्यात जमा झाले. हे पाहून त्याचा विश्वास बसला. त्यानंतर आणखी टास्क दिले. ते देखील पूर्ण केल्यानंतर एकूण १२०० रुपये पाठवले. पुढे, सतीशने ५ हजाराची गुंतवणूक करत टेलिग्रामच्या टास्क ग्रुप ५२ मध्ये अॅड केले होते. त्याने विश्वास ठेवून पैसे पाठवले.
पुढे टास्कचे ७ हजार पूर्ण झाले आहे. त्यासाठी २२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पुढे तांत्रिक बिघाडचे कारण पुढे करत आणखीन २५ हजार भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे परत कधी मिळतील अशी विचारणा करताच त्याने फायनल टास्क पूर्ण करण्याचा बहाणा करत पुन्हा ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. मात्र आधीच सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक केली असताना त्याने पुढील व्यवहार करण्यास नकार दिला.
अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्याने पैसे परत करण्याचा तगादा लावला. मात्र ठगाने त्याला ब्लॉक केले. १९३० वर कॉल करून याबाबत सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.