मुंबई : केस दाखल झाल्याचे सांगत कायदेशीर पडताळणीसाठी सीबीआयच्या बँक खात्यात पैसे पाठवायला सांगत बोरीवलीतील एका विद्यार्थ्याची साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तन्मय परुळेकर (२६, रा. वजिरा नाका, बोरीवली) या विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार, १५ मे रोजी त्याला अनोळखी मोबाइलवरून रेकॉर्डेड फोन आला. त्यात त्याला दिल्ली उच्च न्यायालयातून समन्स बजावले असल्याचे सांगत अधिक माहितीसाठी शून्य क्रमांक दाबण्यास सांगितला. त्याने तो क्रमांक दाबताच संजय शर्मा याने फोन उचलला. लजपतनगर येथे आयसीआयसीआय बँकेत त्याच्या नावावर एक खाते उघडले असून त्यातून २५ लाखांचे बेकायदा व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
१५ लाखांची मागणी -
१) त्याच्यावर केसही दाखल केली असून याप्रकरणी सायबर अधिकारी पुढील चौकशी करतील, असे म्हणत दुसऱ्या व्यक्तीला फोन दिला. त्याने तन्मयचे नाव, त्याच्या बँकेची तसेच त्यातील बचत रकमेची सर्व माहिती घेतली. एक वर्षाचे बँक स्टेटमेंट मागत त्यानंतर त्याच्या नावे २५ बनावट अकाउंट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्या खात्यातील रकमेची कायदेशीर पडताळणी करावी लागणार असल्याचे तो म्हणाला.
२) त्यानंतर त्याने तन्मयला एका बँक खात्याचा क्रमांक देत ते सीबीआयचे खाते असून, रकमेच्या पडताळणीसाठी खात्यातील १५ लाखांची रक्कम पाठवायला सांगितली. तन्मयने जवळपास ९.५० लाख भामट्यांना पाठवले. मात्र, नंतर त्याला संशय आल्याने गुगलवर सर्च केले. तेव्हा अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक झाल्याचे त्याला समजले. त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.