भाजपा-सेनेच्या वादात 'आप'नं घेतली उडी, थेट हनुमान चालीसाचं केलं पठण; 'ट्विटर स्पेस'वर घेतला विशेष कार्यक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 08:23 AM2022-04-25T08:23:37+5:302022-04-25T08:24:11+5:30
Maharashtra Hanuman Chalisa: मुंबईत हनुमान चालीसावरुन राजकारण पेटलेलं असताना आता आम आदमी पक्षानंही या वादात उडी घेतली आहे. भाजप, राणा दाम्पत्य आणि मनसे हनुमान चालीसाचा गैरवापर करत असल्याचं आम आदमी पक्षाच्या मुंबई युनिटनं म्हटलं आहे.
मुंबई-
राज्यात हनुमान चालीसावरुन सुरू असलेलं राजकारण काही केल्या थांबताना दिसत नाही. हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष चर्चेत राहण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन सुरू असलेल्या वादात आता आम आदमी पक्षाच्या मुंबई युनिटनंही उडी घेतली आहे.
आम आदमी पक्षानं आपल्या ट्विटर हँडलवर रविवारी खास हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलं होतं. "भाऊ-बंधुत्व आणि एकतेची हनुमान चालीसा", या कार्यक्रमाअंतर्गत आम आदमी पक्षाच्या मुंबई युनिटच्या ट्विटर हँडलवर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. ट्विटर स्पेसच्या माध्यमातून हनुमान चालीसाचं पठण यावेळी करण्यात आलं. मुंबईत वातावरण अस्थिर करण्यासाठी हनुमान चालीसाच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलं आहे. हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी 'आप'नं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित केलं होतं.
Come, join us in our Twitter Space 'भाऊ-बंधुत्व आणि एकतेची हनुमान चालीसा' where we recite Hanuman Chalisa together!
— AAP Mumbai (@AAPMumbai) April 24, 2022
See you all at 7:00pm (IST). #HanumanChalisa#TwitterSpacehttps://t.co/M60u5NqcTg
हनुमान चालीसा हा हिंदु धर्माचा एक महत्वपूर्ण भाग आहे. पण आपल्या राजकीय उद्दीष्टांसाठी भाजपा, राणा दाम्पत्य आणि मनसेकडून हनुमान चालीसाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. एखाद्या वाईट हेतूसाठी हनुमान चालीसाचा वापर करणं हे एका सच्च्या हनुमान भक्ताची निशाणी नाही, असं आम आदमी पक्षानं म्हटलं आहे.
"भगवान हनुमान प्रत्येकाच्या हृदयात आहेत. जसं प्रभू श्री राम हनुमानाच्या हृदयात आहेत. त्याच पद्धतीनं हनुमानजी प्रत्येक हनुमान भक्ताच्या हृदयात आहेत. ज्या व्यक्तीच्या मनात बजरंगबली आहेत. ते कधीच इतरांना त्रास होऊ देत नाहीत. हनुमान चालीसाचा वापर असा त्रास देण्यासाठी होऊ शकत नाही. याच कारणास्तव राजकीय पक्षांना हनुमान चालीसाचा खरा अर्थ समजावा यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता", असं आपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रिती शर्मा मेनन यांनी सांगितलं.