अभ्युदयनगरमध्ये विराजमान होतो ‘मुंबईचा रथाधीश’; गरजू विद्यार्थ्यांना मंडळाचा मदतीचा हात
By संजय घावरे | Published: September 18, 2023 03:30 PM2023-09-18T15:30:57+5:302023-09-18T15:32:43+5:30
काळाचौकी येथील अभ्युदयनगरमध्ये १९५७ मध्ये ‘अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची स्थापना करण्यात आली.
मुंबई :
काळाचौकी येथील अभ्युदयनगरमध्ये १९५७ मध्ये ‘अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ची स्थापना करण्यात आली. बाळ गंगाधर टिळकांच्या हाकेला साद देत समाज संघटीत करण्याच्या उद्देशाने त्या काळातील मंडळींनी हे मंडळ स्थापन केले. अभ्युदयनगरमधील शहीद भगतसिंग मैदानातील समाज मंदिर हॅालमध्ये दरवर्षी रथाधीश विराजमान होतो.
‘मुंबईचा रथाधीश’ म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. रथाधीशाची मूर्ती साडेसात फुटांची असते. परेलमधील मूर्तीकार सिद्धेश दिगोळे ही मूर्ती घडवतात. कुणाल पाटील, राजू शिंदे अशा काही नामवंत मूर्तिकारांनी रथाधीशाची मूर्ती घडवलेली आहे. रथाधीशाच्या आगमनासाठी फुलांनी सजवलेला रथ बनवला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा रथ असतो. यंदा गरूड बनवला होता. यापूर्वी शंकराची पिंडी, नाग, मोर असे विविध प्रकारचे रथ बनवण्यात आले आहेत. यासाठी १० दिवस मेहनत घेतली जाते. विविध प्रकारच्या १०० किलोहून अधिक फुलांचा वापर केला जातो. फुलांच्या सजावटीचे काम हर्षद खोत करतात. यावर दीड लाख रुपयांहून अधिक खर्च होतो.
गणेशोत्सवात लाखो भक्त रथाधीशाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. देवीदेवतांना पुष्प अर्पण करावे, असे शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. गणपती ही विद्येचीही देवता आहे. त्यामुळे मंडळातर्फे भक्तांना फुले-हारांऐवजी गणेशाच्या चरणी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येते. या आवाहनाला भक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मंडळातर्फे या वस्तू आदिवासी पाड्यांमधील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतात. त्यांना दिवाळीचा फराळही देण्यात येतो. रथाधीशाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा त्यांना शिक्षणासाठी फायदा होतो.
मंडळातर्फे कोविडमध्ये समाजातील दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.
कॅन्सर अवेअरनेससाठी मंडळातर्फे कॅम्पही घेतले आहेत.
मागच्या वर्षी एचआयव्हीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले होते.
कोकणात महापूर आला होता, तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून १ लाख ११ हजार रुपयांची मदत केली होती.
दिवाळीच्या काळात मैदानी खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. इतर वेळी कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला, विद्यार्थी गुणगौरव, तसेच इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. गणेशोत्सवामध्ये १० दिवस जत्रा असते.
मुंबईमध्ये रथाधीशासारखे आगमन कोणत्याच गणपतीचे होत नाही. आम्ही ट्रॅालीवर फुलांची आकर्षक सजावट करतो. अशा प्रकारचा रथ यापूर्वी कोणी बनवलेला नाही. ५९ व्या वर्षी रथ बनवायला सुरुवात केली. साठाव्या वर्षी नाग बनवला. फुलांच्या रथाच्या सजावटीमुळे पुण्यापर्यंत रथाधीशाचे नाव गाजत आहे. या वर्षापासून ‘मुंबईचा रथाधीश’ नाव ठेवले आहे.
- सिद्धेश भोसले (अध्यक्ष)
समाज एकवटला पाहिजेच, पण तरुणाई एकत्र येणे ही आजची गरज आहे. हे काम आमचे मंडळ अविरतपणे करत आहे. आपली संस्कृती जपत, कला, क्रीडा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे मंडळ अग्रस्थानी आहे. गणेशोत्सवात आपलेपणा वाढतो. दूर गेलेले मित्र, नातेवाईक एकत्र येतात. आमच्या मंडळात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे कार्यकर्ते आहेत.
- जतीन गिरकर (चिटणीस)