मुंबईतीलचेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीजवळ शुक्रवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. मुंबई महानगरपालिकेचा कचरावाहू ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेचा कचरावाहू ट्रक शुक्रवारी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास घाटकोपरहून सायनच्या दिशेने जात असताना सिद्धार्थ कॉलनीजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटला. या घटनेनंतर ट्रक चालक अलाउद्दीन शाह (वय, २७) घटनास्थळावरून पळून गेला. परंतु, त्याचा सहकारी अब्दुल (वय, २६) उलटलेल्या ट्रकखाली अडकला.
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करून अब्दुलला बाहेर काढले. त्यानंतर ताबडतोब त्याला राजावाडी रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.