Join us

मुंबई-अहमदाबाद वादग्रस्त बुलेट ट्रेनचा ‘एमएमआरडीए’ला आर्थिक धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 4:05 AM

मूळ प्रस्तावात बदल; कोंडीमुक्तीच्या कामांचा खर्च १९६ कोटींनी वाढला

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली असली तरी ही प्रस्तावित मार्गिका शिळफाटा, कल्याणफाटा, म्हापे जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तयार केलेल्या कामांमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मूळ प्रस्तावात बदल करावा लागला असून, कामाचा खर्च २८६ कोटींवरून ४८२ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

कल्याणफाटा, म्हापे जंक्शन आणि शिळफाटा येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होते. गेल्या काही वर्षांत या भागातली नागरी वस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांचा तासन्तास खोळंबा होत असून वेळ, इंधन आणि पैशांचा अपव्यय होतो. या भागातील प्रदूषणाची पातळीसुद्धा झपाट्याने वाढली आहे.

वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी २०१५ साली एमएमआरडीएने पुढाकार घेतला होता. त्या वेळी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार शिळफाटा ते कल्याणफाट्यापर्यंतचा उड्डाणपूल (दीड किमी) १५९ कोटी, रस्त्यांचे रुंदीकरण (६४ कोटी) वीज वाहिन्या आणि जलवाहिन्यांचे स्थलांतर (२१ कोटी) आणि दरवाढ, सल्लागारांचे शुल्क, आकस्मिक खर्च (४१ कोटी) अशा २८६ कोटी खर्चाचे नियोजन होते. त्यापैकी रस्ता रुंदीकरण आणि वाहिन्यांच्या स्थलांतराची कामे प्रगतिपथावर असून, आजवर १०५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, याच परिसरातून बुलेट ट्रेनची मार्गिका प्रस्तावित असल्याने उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएला सुरू करता आलेले नाही. त्यामुळे मूळ प्रस्तावात बदल केले आहेत. सुधारित प्रस्तावामुळे या भागातील वाहतूक कोंडीवर प्रभावी पद्धतीने मात करता येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.तीन मार्गिकांसाठी २३१ कोटींचा खर्चशिळफाटा जंक्शन येथे ६२४ मीटर लांबीचा (६ मार्गिका), कल्याणफाटा येथे १२९८ मीटर लांबीचा (चार मार्गिका) उड्डाणपूल तर, कल्याणफाटा येथे भुयारी मार्ग (६१८ मी. लांब) बांधला जाईल. या तिन्ही मार्गिकांसाठी २३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय डोंबिवली एमआयडीसी पाइपलाइन रस्त्याचे रुंदीकरण (५४ कोटी), वीज वाहिन्यांचे स्थलांतर (२४ कोटी), दरवाढ, सल्लागारांचे शुल्क आणि आकस्मिक खर्चापोटी ६५ कोटी असा ३७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आजवर खर्च झालेल्या १०५ कोटींचा अंतर्भाव त्यात केल्यास एकूण खर्च ४८२ कोटींवर झेपावल्याचे निष्पन्न होते.

टॅग्स :एमएमआरडीएबुलेट ट्रेन