मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसचे रूपडे पालटले , एक्झिक्युटिव्ह प्रवाशांसाठी बोगीत मर्यादित वाय-फाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:36 AM2018-01-02T04:36:39+5:302018-01-02T04:37:13+5:30
भारतीय रेल्वेचा प्रतिष्ठित एक्स्प्रेसमधील मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. स्वर्ण प्रकल्पांतर्गत शताब्दी एक्स्प्रेस बोगी अत्याधुनिक पद्धतीत बदल करण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रतिष्ठित एक्स्प्रेसमधील मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. स्वर्ण प्रकल्पांतर्गत शताब्दी एक्स्प्रेस बोगी अत्याधुनिक पद्धतीत बदल करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह प्रवाशांसाठी बोगीत मर्यादित वाय-फाय कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र, प्रवासी सुरक्षिततेसाठी आवश्यक सीसीटीव्हींची प्रतीक्षा कायम आहे.
रेल्वे मंत्रालयातील शताब्दी, राजधानी एक्स्प्रेसमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी स्वर्णप्रकल्प घोषित करण्यात आला. प्रकल्पांतर्गत शताब्दी एक्स्प्रेस बोगीतील इंटेरिअरमध्ये बदल करण्यात आले. बोगीला अॅन्टी-ग्राफिटी रंग देत, धूळमुक्त करण्यात आले. आरामदायी आसने, हेडरेस्ट कव्हर, एलईडी दिवे, वैयक्तिक हेडलॅम्प बसविण्यात आले आहेत.
कोरिअन तंत्रज्ञानाचे शौचालयांसह स्वयंचलित वैयक्तिक सीट डिस्पेंसर बसविण्यात आले आहेत. पारंपरिक रंगसंगतीच्या जागी स्वच्छतागृहांमध्ये आधुनिक डिझाइनने घेतली. बोगीमध्ये मुंबई-गुजरात येथील ऐतिहासिक स्थळे, पर्यटनस्थळे यांचे छायाचित्रदेखील लावण्यात आले. प्रवासाची वेळ, अंतर या पत्रकासह सूचनापत्रक बोगीत दर्शनी भागात चिटकविण्यात आले आहेत. एक्झिक्युटिव्ह बोगीत मर्यादित स्वरूपाची वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात चित्रपट व गाण्यांचा समावेश आहे. प्रवाशांना जेवणासाठी विमानातील फूड ट्रॉलीप्रमाणे ट्रॉली एक्स्प्रेसमध्ये देण्यात येत आहे.
‘त्या’ एक्स्प्रेसमध्ये ३५ लाखांत सीसीटीव्ही
नवी दिल्ली-सियालदह एक्स्प्रेसमध्ये स्वर्ण प्रकल्पांतर्गत ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या तुलनेत १५ लाख कमी खर्च करण्यात आले. या एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्हींसह सर्व सुविधा आहेत.
मंजुरीची प्रतीक्षा
बोगींतील सीसीटीव्हीबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन म्हणाले, १०० बोगींत सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येतील.
६ बोगी राखीव
शताब्दी एक्स्प्रेसच्या एकूण २३ बोगींना स्वर्ण प्रकल्पांतर्गत नवे रूप मिळाले आहे. यापैकी १८ बोगी सेवेत असून, ६ बोगी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. \
पहिली बोगी २६ जानेवारीला
स्वर्ण प्रकल्पांतर्गत राजधानी आणि आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्येदेखील याप्रमाणे बदल करण्यात येणार आहे. १०० राजधानी बोगींत हे बदल करण्यात येईल. राजधानी एक्स्प्रेसच्या बोगींचे काम सुरू असून, २६ जानेवारी रोजी पहिली बोगी तयार होईल. मार्चपर्यंत राजधानीच्या ५ बोगींना आधुनिक झळाळी देत, प्रवासी सेवेत दाखल करण्यात येईल.
‘राजधानी, शताब्दी’मध्ये बदल
स्वर्ण प्रकल्पांतर्गत १४ राजधानी एक्सप्रेस बोगींना अंतर्बाह्य झळाळी देण्यात येणार आहे. यात मुंबई-दिल्ली आणि मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानीची निवड करण्यात आली, तर १६ शताब्दी एक्स्प्रेस बोगींचे रूपडे पालटण्यात येणार असून, यात मुंबई-अहमदाबाद या शताब्दी एक्स्प्रेसचा समावेश आहे.