मुंबई आॅन फायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:04 AM2018-01-14T03:04:10+5:302018-01-14T03:04:19+5:30

साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. अंधेरी येथील आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai Air Fire | मुंबई आॅन फायर

मुंबई आॅन फायर

Next

- सचिन लुंगसे

साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. अंधेरी येथील आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. कांजूरमार्ग येथील स्टुडिओला लागलेल्या आगीत एकजण दगावला. एकंदर मागील २० दिवसांमध्ये लागलेल्या आगीने ३१ जणांचे बळी घेतले. विशेषत: कमला मिल कम्पाउंड येथील आगीने प्रशासनाची झोप उडविली. या आगीच्या घटनांमुळे मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग आला. प्रत्यक्षात आता ही कारवाई दिखाऊ होऊ नये, अशी टीका होत असतानाच भविष्यात आगीच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिका आणि अग्निशमन दलाने कार्यतत्पर राहिले पाहिजे.
उपाहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचे, आरोग्य व इमारतविषयक नियमांचे परिपूर्ण पालन केले जाऊन उपाहारगृहे ही अधिकाधिक सुरक्षित व्हावीत, या उद्देशाने आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडिया आणि हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया या संघटनांनी कार्यरत असले पाहिजे; आणि यासाठी महापालिका प्रशासनानेही पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र कोणीच काहीच करत नाही हे दुर्दैव आहे.
मुंबईची लोकसंख्या, विस्तृत प्रदेशाच्या तुलनेने अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. मुंबई अग्निशमन दलासमोर ना हरकत प्रमाणपत्र तयार करणे, त्याचे नूतनीकरण करणे व त्याची तपासणी करणे यासाठी नवा विभाग तयार करणे हे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान आहे. या विभागात ५० अधिकारी व ५० ते ६० कर्मचारी असतील. हे अधिकारी ज्या हॉटेल, कार्यालयांमध्ये अपुरी फायर फायटिंग सिस्टिम, ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही अशा हॉटेल आणि कार्यालयांवर दंडात्मक करणार नाहीत, तर त्यांना संबंधितांचा थेट परवाना रद्द करता येणार आहे. मुळात ना हरकत प्रमाणपत्राचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडची व्यवस्था प्रशासनाला गृहीत धरते.
आपण काहीही केले तरी प्रशासन नाममात्र कारवाई करेल अशी संबंधितांची समजूत झालेली असते. परिणामी असंख्य हॉटेल्स, कार्यालये या प्रमाणत्राचे नूतनीकरण करीत नाहीत; आणि दुर्दैव म्हणजे प्रशासनाकडूनही याबाबत तपासणी केली जात नाही. परिणामी दुर्घटना घडते आणि बळी जातात. हॉटेल्स, मॉल्स, आस्थापना, कार्यालयांमध्ये सुसज्ज अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. यामध्ये फायर हॉस हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, आॅटोमॅटीक स्प्रिंक्लर सिस्टिम असणे गरजेचे आहे. नुसते असणे महत्त्वाचे नाही, तर या यंत्रणा कार्यान्वित आहेत ना याचीदेखील तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र नेहमीप्रमाणे एकदा ही यंत्रणा उभारली की ती सुरू आहे ना हे तपासण्याची तसदीही कोणीच घेत नाही हे दुर्दैव आहे. हॉटेल असो वा घर. येथील स्वयंपाकघर सुरक्षित असणे गरजेचे आहे. हॉटेलमध्ये परवानगी असेल तितकेच गॅस सिलिंडर ठेवण्याची गरज आहे. येथील विद्युत उपकरणेही सुरक्षित असणे गरजेचे आहे. परंतु याबाबत आपण फारसे सतर्क नसतो ही बाबही खेदजनक आहे. हॉटेल असो वा कार्यालय, येथील कर्मचारी वर्गाला अग्निशामक यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी अग्निशमन दल अथवा पालिकेने अशी प्रशिक्षण शिबिरे घेणे गरजेचे आहे.

Web Title: Mumbai Air Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई