प्रदूषणामुळे बिघडली मुंबईची हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:17 AM2018-12-25T06:17:15+5:302018-12-25T06:18:01+5:30
दिल्लीपाठोपाठ आता मुंबईची हवाही बिघडत आहे. सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली, अंधेरी, मालाड येथील वातावरण सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले
मुंबई : दिल्लीपाठोपाठ आता मुंबईची हवाही बिघडत आहे. सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली, अंधेरी, मालाड येथील वातावरण सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले असून, हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावल्याचे ‘सफर’ या संकेतस्थळावर नोंदविण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात थंडीचा कडाका सुरू असतानाच सोमवारी मुंबई शहरासह उपनगरावर मळभ दाटून आले होते. विशेषत: मळभ आणि त्यात वातावरणात जमा झालेली धूळ, धुक्याने निर्माण झालेल्या धूरक्यामुळे मुंबईला प्रदूषणाने वेढल्याचे चित्र होते.
मुंबई शहर आणि पूर्व उपनगराचा विचार करता पश्चिम उपनगरातील वातावरण अधिकच प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. ‘सफर’ या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जाते.
‘सफर’कडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी पश्चिम उपनगरात बोरीवली, मालाड आणि अंधेरी येथील वातावरण अधिक प्रदूषित होते. पूर्व उपनगराचा विचार करता भांडुप आणि चेंबूर येथील वातावरण अधिक प्रदूषित नोंदविण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलाचा परिसरही अधिक प्रदूषित नोंदविण्यात आला. तर, शहराचा विचार करता वरळी, माझगाव आणि कुलाबा येथील हवा व्यवस्थित असल्याची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली आहे.