मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्याने खालावत असून प्रदूषणाच्या बाबतीत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे साम्राज्य होते. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला असून बोरिवली, कांदिवली, मालाड, माझगाव, नेव्हीनगर या ठिकाणी तर या वाईट हवेने टोक गाठल्याचे पहायला मिळाले.
पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे विकास प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धूलिकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धूलिकण आहेत त्यानुसार केले जाते. धूलिकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते.
अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळणारा एक छोटासा पदार्थ असून, या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २.५ ची मात्रा जास्त असते, तेव्हा धुरक्याचे किंवा धूलिकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते.
अतिसूक्ष्म धूलिकणांपेक्षा किंचित मोठा म्हणता येईल, असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धूलिकणाला पीएम १० म्हटले जाते.
हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) निर्देशांक ० ते ५०० मध्ये विविध स्तरावर मोजला जातो. त्यानुसार त्याचा चांगला, वाईट असे स्तर ठरतो. शून्य ते ५० या स्तराला हवेची चांगली गुणवत्ता आहे, असे म्हटले जाते.
मुंबईकरांच्या शरीरात जात आहे : नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि पार्टिक्युलेट
कोणाला अतिजोखीम? लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्ती
व्हायरल इन्फेक्शन असतानाच प्रदूषणाची भर पडली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात छाती जड होणे, श्वासाचे आजार वाढले आहेत. अनेक मुलांचा खोकला खूप दिवस रहात आहे. वेळीच उपचार न केल्यास न्यूमोनियाचा आजार वाढू शकतो. - डॉ. इंदू खोसला, बाल श्वसनविकार तज्ज्ञ, एसआरसीसी रुग्णालय
अर्ध्या मुंबईची गुणवत्ता २०० पारहवेचा दर्जा वाईटबोरिवली २६९मालाड २४३नेव्ही नगर २२८कांदिवली २०७माझगाव २०५देवनार २००
हवेचा दर्जा मध्यमवरळी १८६वांद्रे कुर्ला १५१सायन १४९घाटकोपर १३१भायखळा १३०कुर्ला १२४
तज्ज्ञ म्हणतात, मॉर्निंग वॉकला जाऊ नका
सकाळी मोठ्या प्रमाणात हवेत धूलिकण आणि प्रदूषण असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दिवस वायुप्रदूषणाची पातळी खाली येईपर्यंत मॉर्निंग वॉक थांबविण्याची गरज आहे. या वातावरणात प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात जात आहे.
प्राणवायू शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. मेंदूला रक्तपुरवठा करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करा. शक्य असल्यास योग आणि प्राणायाम करा.