लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - देशभरातील विमानतळात अग्रगण्य असलेल्या मुंबई विमानतळाने आरोग्य सुरक्षेबाबतही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून सलग दुसऱ्या वर्षी आरोग्य मानांकन प्राप्त करणारे ते देशातील एकमेव विमानतळ ठरले आहे.
कोरोना काळात हवाई वाहतूक क्षेत्राला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असले तरी, मुंबई विमानतळाने आरोग्य सुरक्षेबाबत कोणतीही कसूर सोडलेली नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करीत कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. विमानतळाने वेळोवेळी हाती घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांची आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने दखल घेतली.
या परिषदेने २०२० पासून विमानतळासाठी आरोग्य मानांकन कार्यक्रम सुरू केला आहे. कोरोना काळात जगभरातील विमानतळांनी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे मूल्यांकन या माध्यमातून करण्यात येते. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने स्थापन केलेल्या कौन्सिल एव्हिएशन रिकव्हरी टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शारीरिक अंतर, कर्मचारी संरक्षण, भौतिक मांडणी आणि प्रवासी सुविधा आदींचा यात विचार केला जातो.
या सर्व निकषावर खरे उतरत पहिल्याच वर्षी मुंबई विमानतळाने आरोग्य मानांकन प्राप्त केले. असे मानांकन प्राप्त करणारे ते देशातील पहिले आणि एकमेव विमानतळ ठरले. आता सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान पटकावत मुंबई विमानतळाने आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे.
......
अशी घेतली खबरदारी
- प्रवेशद्वारावर स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग, पीपीई किटचा वापर, निर्जंतुकीकरण, विमानतळ परिसरात सुरक्षात्मक नियमांचे काटेकोर पालन
- संपूर्ण विमानतळावर संपर्कविरहित सुविधांची निर्मिती. त्यात सेल्फ-चेक इन, ई-बोर्डिंग पाससह, सर्व टचपॉईंटचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण, विमानतळांवरील कॅबचे सॅनिटायझेशन व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.