मुंबई - मान्सून पश्चात विमानतळावरील सर्व व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी मुंबईविमानतळावर १७ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असून याकरिता त्या दिवशी सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळात विमानतळावरील दोनही रन-वे बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये मुंबईतून कोणतेही विमान उड्डाण घेणार नाही अथवा मुंबईत दाखल होणार नाही.
या संदर्भात विमान कंपन्यांना देखील सहा महिने अगोदर त्यानुसार विमान प्रवासाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे. दरवर्षी मान्सूनच्या आधी व मान्सून संपल्यानंतर मुंबई विमानतळावरील रन-वेच्या देखभालीचे काम केले जाते. रन-वेवर आवश्यक ती डागडुजी केली जाते. तसेच अन्यही कामे केली जातात. मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. त्यामुळे तेथील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवल्याशिवाय देखभालीचे काम करता येत नाही.