लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्यस्त विमानतळांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई विमानतळाने कोरोना प्रतिबंधक लसींच्या वाहतुकीत आघाडी घेत, लसीकरणाला बळ देण्याचे काम केले आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावरून जगभरातील १३९ ठिकाणांवर १०७ दशलक्ष डोस पोहोचविण्यात आले आहेत.
कोविशिल्ड लसनिर्मितीचे केंद्र पुण्यात असल्यामुळे स्वाभाविक मुंबई विमानतळावरून त्याचे वहन करावे लागणार असल्याने प्रशासनाने त्यासाठी विशेष नियोजन केले. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या एअर कार्गो टर्मिनलची भूमिका यात महत्त्वाची होती. या टर्मिनलमध्ये आशियातील सर्वांत मोठे तापमान नियंत्रित फार्मा एक्सलेन्स सेंटर आहे. शिवाय इम्पोर्ट कोल्ड झोन, स्वदेशी बनावटीचे कूलटेनर अशा सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडता आली. आतापर्यंत मुंबई विमानतळावरून परदेशात ५५.८ दशलक्ष, तर देशभरातील विविध ठिकाणी ५१.३० दशलक्ष डोस पोहोचवण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळाकडून देण्यात आली. त्याशिवाय समर्पित कोविड-टास्क फोर्स तैनात करण्यात आली आहे.
९२३ टन वैद्यकीय मदतीचे वहन
लस वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत १० मिनिटांत ऑफलोडिंगसह सरासरी २५ मिनिटांत सर्व प्रक्रिया पार पडावी, हा यामागील उद्देश आहे. तसेच २४ तास सुरू असणारे सेवा केंद्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या लाटेच्या काळात वैद्यकीय सामग्रीच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी मुंबई विमानतळाने पुढाकार घेतला. या काळात तब्बल ९२३ टन वैद्यकीय मदतीचे वहन करण्यात आले. त्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह अन्य अत्यावश्यक साहित्याचा समावेश होता.
.........
वैद्यकीय मालवाहतूक - १३ हजार ५०० टन
विमानांचा वापर - १३ हजार ६९०