मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या गैरव्यवस्थापनाचा फटका प्रवाशांना बसला असून ३० हून अधिक प्रवाशांची फ्लाईट मिस झाली. यानंतर विमानतळ प्रशासनाकडूनही स्पष्टीकरण देण्याच आलं आहे.
"सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. आज सकाळी ही वाढ अतिशय अधिक होती. देशातील अन्य विमानतळांवरही मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याचा अनुभव आला. याशिवाय गुप्तचर संघटनेच्या रिपोर्टनुसार राज्यातील अन्य आणखी एका विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे," असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
आमचं आमच्या प्रवाशांच्या सुक्षेला प्राधान्य आहे. यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. विमानतळ प्रशासानानं प्रवाशांना चांगला अनुभव मिळावा यासाठी तेजीनं पावलं उचलत अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. तसंच या ठिकाणी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचंही पालन केलं जात आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असंही त्यांनी म्हटलं.
काय घडला होता प्रकार?निर्बंधात दिलेली शिथिलत आणि लसीकरणाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे हवाई प्रवासी संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. परिणामी मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर गर्दी होताना पहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर या गर्दीने कळस गाठला. त्यात भर म्हणजे विमानतळाचे प्रवेशद्वार आणि चेक इन काउंटरवर कमी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने लांबलचक रांगा लागल्या. हळूहळू या रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली, तरी प्रवाशांना आत प्रवेश मिळत नव्हता.
त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. काही जणांनी तर 'क्यू लॉक' तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान 6E5731 हे विमान मुंबई हैदराबाद नियोजित होते. परंतु, १५ हून अधिक प्रवाशांना वेळेआधी पोहोचता न आल्याने त्यांना न घेताच विमान निघून गेले. अन्य १५ ते २० प्रवाशांसोबतही असाच प्रकार घडला. त्यामुळे गोंधळलेल्या प्रवाशांनी धावाधाव सुरू केली. त्यामुळे काहीकाळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.