Join us  

विमानतळावरील वेळापत्रक भरकटले, बिपोरजॉयचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 5:57 AM

शेकडो प्रवाशांची लटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बिपोरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर रविवारी रात्री मुंबईविमानतळावरील धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विमानोड्डाणांचे वेळापत्रकच कोलमडले. अनेक विमाने रद्द झाली तर अनेक विमानांनी पाच ते सहा तास उशिराने उड्डाण केले. यामुळे रविवारी रात्री मुंबई विमानतळावर शेकडो प्रवाशांना ताटकळावे लागले. परिणामी प्रवासी आणि संबंधित विमान कंपन्या यांच्यात खटकेही उडाले.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर धावपट्टी बंद ठेवण्याची घोषणा झाली. त्यानंतर एअर इंडिया, इंडिगो एअरलाइन्स, एअर एशिया अशा सर्वच विमान कंपन्यांनी आपल्या नियोजित विमानांची सेवा काही काळासाठी स्थगित केली. तसेच त्यांचे पुनर्नियोजन केले. आपल्या काही विमानांचे उड्डाण रद्द केल्याचे एअर इंडियाने ट्विटरद्वारे कळविले. तर अन्य कंपन्यांनीही आपल्या रद्द व पुनर्नियोजित झालेल्या विमानांची वेळ कळविण्यासाठी हाच मार्ग अवलंबला. मात्र, विमानतळावर पोहोचल्यानंतर अनेक प्रवाशांना वेळापत्रकातील बदलाविषयी समजले. त्यानंतर विमानतळावर सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत गोंधळाचे वातावरण होते. काही विमाने दोन तास तर काही विमाने ५ तास उशिराने अवकाशात झेपावली. त्यातही काही विमानांचे प्रवेशद्वार तीन ते चार वेळा बदलण्यात आल्यामुळे एअर पोर्ट टर्मिनलवर प्रवाशांची धावपळ झाली होती.

पर्यायी रनवे सुरू

  • दिवसाकाठी ९५० हून अधिक विमान उड्डाणे हाताळणाऱ्या मुंबई विमानतळावरील पर्यायी धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याची घोषणा विमानतळ प्रशासनाने सोमवारी केली. 
  • मुख्य धावपट्टी आणि पर्यायी धावपट्टी अशी रचना मुंबई विमानतळावर आहे. मात्र, या पर्यायी धावपट्टीचे काम डिसेंबरपासून सुरू झाले होते. ते अद्ययावत पद्धतीने आणि नियोजनबद्धरीत्या निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
टॅग्स :मुंबईविमानतळविमानचक्रीवादळ