मुंबई : कोरोनामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राची अर्थगती मंदावली असताना, मुंबई विमानतळाला मात्र क्रिकेटचा हंगाम पावला आहे. आयपीएल आणि टी-२० विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या तब्बल १ लाख १० हजार क्रिकेटप्रेमींनी मुंबई विमानतळाचा आधार घेतला, त्यांच्या सेवेकरिता ६५५ विमाने धावपट्टीवर उतरविण्यात आली.
कोरोनाची मरगळ झटकत यंदा दुबईत प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट सामने खेळविण्यात आले. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रमींचा मेळा तेथे भरला. या दोन्ही स्पर्धांसाठी भारतातून सर्वाधिक प्रेक्षक रवाना झाले. त्यातील मुंबईकरांची संख्या १ लाख १० हजार २० इतकी होती. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात आयपीएलचा हंगाम साधत मुंबई विमानतळ प्रशासनाने ३५० विमानांचे नियोजन केले. त्यामाध्यमातून ५६ हजार ३०० क्रिकेटप्रेमी दुबईला रवाना झाले.आयपीएलकाळात मुंबईतून ३१ हजार ७७९ प्रवाशांना घेऊन १७७ विमाने दुबईला रवाना झाली. परतीच्या प्रवासात १७३ विमानांद्वारे २४ हजार ५१६ जण मुंबई विमानतळावर दाखल झाले.
एकूण प्रवास करणारे क्रिकेटप्रेमी १,१०,०००
विमानांचे उड्डाण ६५५
आयपीएल हंगामात एकूण उड्डाणे ३५०
आयपीएलसाठी गेलेले प्रवासी ५६,३००
विश्वचषक स्पर्धेसाठी गेलेले क्रिकेटप्रेमी ५३,७२०