मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उत्कृष्ट पायाभूत सुविधांसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या जागतिक पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराने विमानतळाला गौरवण्यात आले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ च्या इमारतीच्या निर्मितीबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे. नवी दिल्लीत झालेल्या ‘ईपीएस वर्ल्ड’ परिषदेत मुंबई विमानतळाला हा पुरस्कार मिळाला.
२०१४ मध्ये विमानतळावर नवीन टर्मिनल २ इमारत बांधण्यात आली असून त्यासाठी ९८ अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२ हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. वर्षभरात ४ कोटी प्रवासी वापर करू शकतील अशा प्रकारे या टर्मिनलची रचना करण्यात आली आहे. टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय व बहुसंख्य देशांतर्गत उड्डाणांच्या प्रवाशांसाठी येथे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करण्याची गरज भासत नाही. हवाई प्रवाशांसाठी लागणाऱ्या विविध सेवांचे एकत्रीकरण करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळेच टर्मिनल २च्या इमारतीचे बांधकाम हे देशातील विविध सार्वजनिक उपयोगांच्या प्रकल्पांमधील सर्वोत्तम बांधकाम ठरले आहे.२४ तासांत तब्बल १,००७ उड्डाणेमुंबई विमानतळाने नुकताच स्वत:चाच विक्रम मोडीत काढला असून २४ तासांत तब्बल १००७ विमानांचे उड्डाण केले आहे. मागील विक्रम १००३ विमानोड्डाणांचा होता. यापूर्वी ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबई विमानतळावर २४ तासांत ९८० विमानांनी उड्डाण केले होते. तर २४ नोव्हेंबर, २०१७ रोजी ९३५ विमानांनी उड्डाण केले होते.