कोरोनाकाळात मुंबई विमानतळ सर्वाधिक तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:48+5:302021-07-26T04:05:48+5:30

मुंबई : सर्वांत व्यस्त विमानतळांच्या यादीत असलेल्या मुंबई आणि दिल्लीने उत्पन्नाच्या बाबतीत घोर निराशा केली आहे. कोरोनाकाळात मुंबई विमानतळाला ...

Mumbai airport at a loss during the Corona period | कोरोनाकाळात मुंबई विमानतळ सर्वाधिक तोट्यात

कोरोनाकाळात मुंबई विमानतळ सर्वाधिक तोट्यात

Next

मुंबई : सर्वांत व्यस्त विमानतळांच्या यादीत असलेल्या मुंबई आणि दिल्लीने उत्पन्नाच्या बाबतीत घोर निराशा केली आहे. कोरोनाकाळात मुंबई विमानतळाला तब्बल ३८४.८१ कोटी, तर दिल्ली विमानतळाला ३१७.४१ कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील १३६ विमानतळांच्या वर्षभरातील कामगिरीचा अहवाल नुकताच लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानुसार, कोरोनाकाळात या सर्व विमानतळांना जवळपास २ हजार ८८२.७४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. तोट्यातील विमानतळांत मुंबई सर्वांत वरच्या स्थानी असून, त्याखालोखाल दिल्ली, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि अहमदाबादचा नंबर लागतो. मुंबई विमानतळाला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३८४.८१ कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे अलीकडेच या विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेतलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंगसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. सेवा शुल्कावर नियंत्रण राखतानाच प्रवासी संख्या वाढवून उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

पुणे आणि जुहू विमानतळांची कामगिरी दिलासादायक आहे. देशातील सर्वांत नफ्यातील विमानतळांत पुणे पहिल्या स्थानी असून, जुहू, श्रीनगर, पटना आणि कानपूर विमानतळांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. हवाई दलाच्या ताब्यात असलेल्या पुणे विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या साहाय्याने विमान प्रचलन केले जाते. धावपट्टीची दुरुस्ती आणि इमारतीच्या विस्तारीकरणामुळे सध्या येथे पूर्ण क्षमतेने कामकाज चालत नसले तरी कोरोनाकाळात या विमानतळाला १६.०९ कोटींचा नफा झाला आहे. पुण्याखालोखाल जुहू विमानतळ तब्बल १५.९४ कोटींनी फायद्यात असल्याचे समोर आले आहे. एकाही शेड्यूल फ्लाइटचे उड्डाण होत नसलेल्या जुहू विमानतळाची कामगिरी कोरोनाकाळात एअरपोर्ट ॲथॉरिटीला आधार देणारी ठरली आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बऱ्याच जणांनी शेड्यूल विमानांऐवजी चार्टर विमानाचा प्रवास पसंत केला. परिणामी, या विमानांची ये- जा वाढल्याने जुहू विमानतळाच्या उत्पन्नात वाढ झाली. शिवाय हवाई रुग्णवाहिकांचे प्रचलन वाढल्याने त्याचा फायदाही झाला, अशी माहिती हवाई वाहतूकतज्ज्ञांनी दिली.

सर्वाधिक तोट्यातील विमानतळे

विमानतळ तोटा (कोटींमध्ये)

मुंबई ३८४.८१

दिल्ली ३१७.४१

चेन्नई २५३.५९

त्रिवेंद्रम १००.३१

अहमदाबाद ९४.१०

.........

कोरोनाकाळातही फायद्यात असलेली विमानतळे

विमानतळ नफा (कोटींमध्ये)

पुणे १६.०९

जुहू १५.९४

श्रीनगर १०.४७

पटना ६.४४

कानपूर ६.०७

Web Title: Mumbai airport at a loss during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.