मुंबई विमानतळावर प्रवाशांना आणखी वर्षभर भरावे लागणार विकास शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:21+5:302021-03-31T04:06:21+5:30
लोकम न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी वर्षभर विकास शुल्क (डेव्हलपमेंट फी) भरावे लागेल. कोरोनामुळे ...
लोकम न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी वर्षभर विकास शुल्क (डेव्हलपमेंट फी) भरावे लागेल. कोरोनामुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उद्दिष्टांइतकी रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे विकास शुल्क वसुलीस ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने सांगितले.
मुंबई विमानतळावर विविध विकासकामांसाठी ३ हजार ८४५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यासाठी प्रवाशांकडून विकास शुल्क वसूल करण्यास २०१२ साली परवानगी देण्यात आली. तेव्हापासून विमान तिकिटात या शुल्काचा अंतर्भाव करण्यात येतो. दर सहा महिन्यांनी आढावा घेऊन शुल्कात वाढ करायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जातो. सध्या देशांतर्गत प्रवाशांकडून १२० रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून ७२० रुपये इतके विकास शुल्क घेतले जाते.
३१ मार्च २०२१ पर्यंत विकास शुल्क आकारणी करण्यास मुंबई विमानतळ प्रशासनास परवानगी देण्यात आली होती. परंतु कोरोनाकाळात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने उद्दिष्टांइतकी रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शुल्क वसुलीस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने याबाबत सविस्तर आढावा घेतला असता ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा ६२७.२७ कोटी रुपयांची तूट दिसून आली. त्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आल्याचे समजते.
* तिकिटातून किती पैसे कापणार?
देशांतर्गत प्रवासासाठी-१२० रुपये
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी-७२० रुपये
---------------------