"एक मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा...", मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:34 AM2023-11-24T08:34:09+5:302023-11-24T08:43:04+5:30

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.

Mumbai Airport receives T2 bombing ‘threat’, sender demands USD 1 million in Bitcoin | "एक मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा...", मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

"एक मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा...", मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : मुंबईत फोनद्वारे धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई  पोलिसांना मोठा घातपात करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. ही धमकी मेलद्वारे मिळाली असल्याचे, सूत्रांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे.

हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा बॉम्बस्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत 1 मिलियन डॉलर्स देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम धमकी देणाऱ्या व्यक्तीने बिटकॉइनमध्ये मागितली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहार पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला, ज्याने quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरून धमकीचा ईमेल पाठवला. आरोपीने आज सकाळी 11.06 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या (MIAL) फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.

धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता. यामध्ये आरोपीने म्हटले होते की, "तुमच्या विमानतळासाठी ही अंतिम चेतावणी आहे. सांगितलेल्या महिती प्रमाणे न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, आम्हाला बिटकॉइनमध्ये 1 मिलियन डॉलर्स पाठवा". 

दरम्यान, 24 तासांत आरोपीने धमकीचे दोन मेल केले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकावणं आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 385, 505(1) (बी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता, त्याचा शोध घेण्यात आला आहे. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलीस आता प्रयत्न करत आहेत. 

Web Title: Mumbai Airport receives T2 bombing ‘threat’, sender demands USD 1 million in Bitcoin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.