मुंबई विमानतळावरील धावपट्टी सोमवारपासून बंद; मोठी दुरुस्ती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:25 AM2019-11-02T01:25:42+5:302019-11-02T06:47:48+5:30

४ नोव्हेंबर ते २८ मार्चदरम्यान सोमवार ते शनिवार दिवसभर ८ तास करणार काम

Mumbai airport runway closed Monday; Major repairs | मुंबई विमानतळावरील धावपट्टी सोमवारपासून बंद; मोठी दुरुस्ती करणार

मुंबई विमानतळावरील धावपट्टी सोमवारपासून बंद; मोठी दुरुस्ती करणार

Next

मुंबई : मुंबईविमानतळाची ९-२७ ही मुख्य धावपट्टी महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी ४ नोव्हेंबर २०१९ ते २८ मार्च २०२० या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच यादरम्यान बंद राहील. या कालावधीत दर सोमवार ते शनिवारपर्यंत धावपट्टी बंद राहील. केवळ रविवारी तिचा वापर केला जाईल. या कालावधीत हजारो उड्डाणे रद्द झाल्याने व काहींचे मार्ग बदलण्यात येणार असल्याने विमान वाहतुकीला फटका बसून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ०९-२७ ही मुख्य धावपट्टी आहे. ज्या वेळी मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असते तेव्हा १४-३२ या दुसऱ्या धावपट्टीचा वापर होतो. मुख्य धावपट्टीची क्षमता प्रति तास ४८ विमानांची वाहतूक करण्याची, तर पर्यायी धावपट्टीची क्षमता प्रति तास ३५ विमानांची वाहतूक करण्याची आहे. मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८० लाख ४९ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी बंद होणार असल्याने त्याचा ताण पर्यायी धावपट्टीवर येईल. तिची क्षमता कमी असल्याने त्याचा फटका विमानसेवेला बसेल. या कालावधीत सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देशातील दुसºया क्रमांकाचे व्यस्त विमानतळ
देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांमध्ये मुंबई विमानतळाचा दिल्लीनंतर दुसरा क्रमांक लागतो. ८ डिसेंबर २०१८ रोजी २४ तासांमध्ये तब्बल १००४ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम प्रस्थापित करण्यात विमानतळाला यश आले होते. त्यापूर्वी २४ तासांमध्ये १००३ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम ५ जून रोजी करण्यात आला होता. २४ तासांमध्ये साधारणत: ९५० विमानांची वाहतूक विमानतळावरून होते. मुंबईतील अवकाळी पाऊस पडत असल्याने १ नोव्हेंबरऐवजी ४ नोव्हेंबरपासून धावपट्टी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

या दिवशी मुख्य धावपट्टीचा वापर होणार
दुरुस्तीचे काम सुरू असताना रविवारी मुख्य धावपट्टीचा वापर केला जाईल. याव्यतिरिक्त नाताळनिमित्त २५ डिसेंबर २०१९, नववर्षानिमित्त १ जानेवारी २०२०, १५ जानेवारी, १९ जानेवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या दिवशी मात्र मुख्य धावपट्टी वापरात असेल.
धावपट्टीची दुरुस्ती कशासाठी?
विमान उतरताना धावपट्टीवर मोठा ताण येत असतो. त्यामुळे प्रत्येक लँडिंगनंतर धावपट्टीची झीज होत असते. विमानाच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धावपट्टी सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असते; त्यामुळे धावपट्टीच्या दुरुस्तीवर विशेष लक्ष देण्यात येते. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान दोन धावपट्टींच्या छेदणाºया भागाची दुरुस्ती करण्यात आली होती.
प्रवाशांना परतावा मिळणार
या कालावधीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानांचा मार्ग बदलण्यात येईल. काही विमानांच्या वेळेत बदल होईल. रद्द केल्या जाणाºया विमानांच्या प्रवाशांना परतावा मिळेल, शक्य असेल त्यांना दुसºया विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे समजते.
मोठ्या विमान उड्डाणांना फटका

मुख्य धावपट्टी ९-२७ ही ३६६० मीटर अंतर लांब (१२ हजार ८ फूट) असून ६० मीटर (२०० फूट) रुंद आहे. घाटकोपर-विलेपार्ले अशी धावपट्टीची दिशा आहे. तर पर्यायी धावपट्टी १४-३२ ही २९९० मीटर लांब (९ हजार ८१० फूट) व ४५ मीटर (१४८ फूट) रुंद असून कुर्ला ते अंधेरी अशी धावपट्टीची दिशा आहे. मुख्य धावपट्टी अधिक लांब व अधिक रुंद असल्याने मोठी विमाने या धावपट्टीवर उतरविणे सहजशक्य होते, मात्र पर्यायी धावपट्टी तुलनेने कमी लांब व कमी रुंद असल्याने मोठ्या विमानांना या धावपट्टीवर उतरविणे अडचणीचे ठरते. मुख्य धावपट्टीपेक्षा पर्यायी धावपट्टीची लांबी कमी असल्याने त्याचा वापर शक्यतो कमी प्रमाणात केला जातो.

Web Title: Mumbai airport runway closed Monday; Major repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.