मुंबई विमानतळावर १७४ कोटींचे सोने, विदेशी चलनासह अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:58 AM2019-07-01T01:58:55+5:302019-07-01T01:59:16+5:30
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विभागाने ही कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये व मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
- खलील गिरकर
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) वर्षभरात केलेल्या कामगिरीमध्ये तब्बल १७४ कोटी ३७ लाख रुपये किमतीचे सोने, विदेशी चलन व अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये ४८१.५५ किलो सोन्याचा समावेश आहे. विदेशी चलन व अमली पदार्थांच्या तुलनेत सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विभागाने ही कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये व मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
मुंबई विमानतळावर जगातील अनेक देशांच्या विमानांची ये-जा सुरू असते. दुबई व इतर आखाती देशांतून येणाऱ्या विमानांमधील प्रवासी सोन्याची आयात करताना त्याचे सीमा शुल्क भरण्यास टाळाटाळ करतात. यासाठी विविध क्लृप्त्या अवलंबून सोने तस्करी केली जाते. कधी कपड्यांमध्ये, कधी चप्पल, बूट, मोबाइल कव्हर, कधी आणखी कशाचा वापर करून सोने व अमली पदार्थ लपवून आणले जातात. अनेकदा सोने बिस्किटाच्या रूपात आणले जाते. एआययू युनिटला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर अशा प्रवाशांवर पाळत ठेवली जाते व त्यांच्याकडील सोने, चांदी, अमली पदार्थ जप्त केले जातात व त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाते. भारतीय सीमा शुल्क कायदा १९६२ अन्वये त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते. सीमा शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली एआययू युनिटतर्फे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२३३ जणांना अटक; ७८ विदेशी नागरिक
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईमध्ये सोने तस्करीची ४९८ प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये ४८१.५५ किलो सोने जप्त करण्यात आले. त्याचे बाजारमूल्य १३५ कोटी ९९ लाख आहे. या प्रकरणांमध्ये २३३ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये १५५ भारतीय व ७८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. गतवर्षी या कालावधीत ३६२ प्रकरणांध्ये ९५ कोटी २८ लाख रुपये मूल्याचे ५६.७ किलो सोने जप्त करण्यात आले. त्यामध्ये १९५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये १४८ भारतीय व ४७ विदेशी नागरिकांचा समावेश होता.
- प्रमाणापेक्षा जास्त विदेशी चलनाचा वापर केल्याप्रकरणी या वर्षात ६३ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यामध्ये २३ कोटी २९ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या विक्रीवर पायबंद घालण्यासाठी केलेल्या कारवाईत १५ कोटी ९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
या विविध प्रकरणांमध्ये गुंतलेल्या आरोपींविरोधात सध्या कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. प्रवाशांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून दूर राहावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.